सावंतवाडीत २४ ते २७ जानेवारीला दशावतार महोत्सव…

114
2
Google search engine
Google search engine

राजघराण्याच्या माध्यमातून आयोजन; २८ जानेवारीला होणार लोककला महोत्सव…

सावंतवाडी,ता.२०: येथील राजघराणे आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी राजवाडा येथे २४ ते २७ या काळात दशावतार महोत्सव तर २८ जानेवारीला लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिली. स्थानिक कलेला आणि कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या पिंगळी, पांगुळ बैल, गोफ नृत्य, गोंधळ आदी लोककला पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. आज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी प्रभारी प्राचार्य एम. ए. ठाकूर, प्रा. दिलीप गोडकर, डॉ. बी. एन. हिरामणी,  डॉ. गणेश मर्गज, प्रा. बाळासाहेब नंदीहळळी, राजेंद्र बिर्जे, अण्णा देसाई व बाळू धुरी आदी उपस्थित होते.

दरम्यान या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदि उपस्थित राहाणार आहेत.

दशावतार महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून जिल्ह्यातील विविध दशावतारी मंडळाना व कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या दशावतार महोत्सवात बुधवार २४ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते रात्री ८ पर्यंत जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस – दांडेली यांचा ‘टप्केश्वर तीर्थक्षेत्र’ तर रात्री ८.३० ते १० पर्यंत वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगांव यांचा ‘ लक्ष्मी पूजन ‘ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

तर गुरुवार २५ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ८ चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा ‘अजिंक्य मणी’ तर रात्री ८.३० ते १० कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा पराशक्ती दहन हा नाट्यप्रयोग होणार आहे.

शुक्रवार २६ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ८ आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा ‘शिवमहिमा ‘ तर रात्री ८.३० ते १० वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा ‘ अघोर लक्ष्मी ‘ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

तर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी २७ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ८ दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ‘मीनाश्री सुंदरेश्वर’ तर रात्री ८.३० ते १० नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड यांचा ‘ गणेश मंगळ युद्ध ‘ हा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.

तर सहयोग ग्रामविकास मंडळ गरड, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २८ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता राजवाडा येथील पटांगणावर “लोककला महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व येथील लोककला टिकाव्यात व त्या वृदधींगत व्हाव्यात या हेतूने राजवाडा सावंतवाडी येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २८ जानेवारीला सायंकाळी ६.०० ते १०.३० वा “लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित लोककला मंडळे यांच्या कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, छायानाट्य, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ, गोफनृत्य, चपई नृत्य, समई नृत्य, वासुदेव, पांगुळबैल अशा लोककलांचा समावेश करण्यात आला आहे.

या लोककला महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत लोककलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, संगीत नाटक अकादमी भारत सरकारचा गुरुवर्य सन्मान प्राप्त, तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी गिरीजन राज्य सांस्कृतीक पुरस्कार प्राप्त श्री. बाळकृष्ण गणपत मसगे यांचे दयती लोककला संवर्धन अकादमी, पिंगुळी ता. कुडाळ यांचे कळसुत्री बाहुल्यांचा, चामड्याच्या बाहुल्यांचा शो, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ तसेच श्री गणेश लांबर यांचे अंबाई सिध्दाई चपई नृत्य ग्रुप परुळे, ता. वेंगुर्ले, तसेच श्री विनायक जोशी यांचे संत लालाजी महिला समई नृत्य ग्रुप मठ, ता. वेंगुर्ला, सौ. विलासिनी नाईक यांचा सोमेश्वर महिला मंडळ वेतोरे, ता. वेंगुर्ला गोफ नृत्य ग्रुप सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.