विज्ञानाची कास धरून मुलांनी चंद्रावर जाण्याचे स्वप्न पहावे…

218
2
Google search engine
Google search engine

एकनाथ शिंदेंचे आवाहन; ५१ व्या विज्ञान प्रदर्शनाचे सावंतवाडीत थाटात उद्घाटन…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.१०: विज्ञानाची कास धरून मुलांनी जीवनात यशस्वी व्हावे, एवढेच नव्हे तर चंद्रावर जाण्याचे स्वप्न पहावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनात केले. आधुनिक भारत घडवायचा आहे. याचे महत्त्व ओळखून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञानाला महत्त्व दिले आहे. “स्कील इंडिया” सारखे प्रकल्प राबवले आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन जीवनात यशस्वी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते माजगाव धरण योजना, त्याचबरोबर पाळणेकोंड पाणी योजना या दोन्ही योजनांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विज्ञानाची कास धरा आणि यशस्वी व्हा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शिक्षणाधिकारी श्री. कुडाळकर, सावंतवाडी बी.डी.ओ वासुदेव नाईक, गट शिक्षणाधिकारी सौ. बोडके, अशोक दळवी, डॉ. राधा अतकरी, अन्नपूर्णा कोरगावकर, राजन पोकळे, अमेय प्रभू, नारायण राणे, राहूल रेखावर, मकरंद देशमुख, कृष्णकुमार पाटील, डॉ. अर्चना सावंत, कुणकेरी सरपंच सोनाली सावंत, ॲड. निता कविटकर, महेश चोथे, आबा केसरकर, नंदू गावडे, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.

यावेळी शिंदे पुढे म्हणाले, आधुनिक भारत घडवण्यासाठी विज्ञान हा महत्वाचा घटक आहे. जगभरातील अनेक देश आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत. भारतही विज्ञानाच्या बळावर विविध क्षेत्रात आत्मनिर्भर बनत आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी देखील विज्ञानाचे महत्व ओळखून विज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. त्याचा परिणाम म्हणून आपला देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश ठरला आहे. कोविड उपचारावर लस बनविणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आपण स्थान प्राप्त करु शकलो. विज्ञान क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी आपल्या देश सातत्याने करीत आहे. देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम आवश्यक ठरतात.

ते पुढे म्हणाले, सावंतवाडी येथे आयोजित या उपक्रमाबद्दल शालेय शिक्षण विभागाचे कौतुक करायला हवे. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळणे, ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून विविध उपक्रमातून शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहे. यासाठी राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात येत आहे. या धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पुस्तकांमध्येच सरावासाठी कोरी पाने दिल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले आहे. शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत पाच पट वाढ करण्यात येऊन आता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रूपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान मिळावे आणि शेतीचे महत्त्व समजावे यासाठी शेती हा विषय शिकविण्यात येणार आहे. मानसिक विकासासाठी वाचन गरजेचे असते, यासाठी ‘रिड महाराष्ट्र’ उपक्रमाबरोबरच ग्रंथालयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. आजच्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाबरोबर सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारित करणे या कामाचे भूमिपूजन होत आहे. राज्यातील शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून स्वच्छता, पाणी पुरवठा अशा महत्वाच्या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आपली शहरे स्वच्छ आणि सुंदर व्हावीत, यासाठी आपण संपूर्ण राज्यात डीप क्लिन मोहिम राबवत आहोत.

या प्रसंगी केसरकर यांच्या हस्ते या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्ट आयोजन करणारे भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विज्ञान मंडळाच्या संचालक राधा अतकरी व अन्य मान्यवरांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. तर अच्युत भोसले, मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासह अन्य मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भोसले नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत व विज्ञान गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळाच्या संचालक राधा अतकरी यांनी केले. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या मागची संकल्पना विशद केली. सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. अमर प्रभूभोसले यांनी केले. तर शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी आभार मानले.