मारहाण प्रकरणी आंबोली येथील एकाला अटक…

1017
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०६: काजू बागेत चोरी केल्याच्या गैरसमजातून माडखोल डुंगेवाडी येथील विजय पुंडलिक राऊळ यांना मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी संजय जयराम गावडे ( रा. आंबोली ) याला सावंतवाडी पोलिसांनी आज अटक केली. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काजू बागेत चोरी केल्याच्या संशयावरून संजय गावडे यांने मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास राऊळ यांना घरात जाऊन दांड्याने बेदम मारहाण केली होती. यामध्ये राऊळ यांच्या डोक्याला गंभीर इजा पोहचून हात व पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे.

अटकेत असलेला संजय गावडे हा आपण तलाठी असल्याचे सांगून गावात दहशत पसरवत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे त्याला अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार आज त्याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोरडी सुनावण्यात आली आहे. या कामी ॲड. धनश्री गोवेकर यांनी काम पाहिले.