स्वच्छ व पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टिक कचरा नको…

65
2
Google search engine
Google search engine

स्वच्छता मिशनचे आवाहन; संदेश देण्यासाठी कोकण रेल्वेने प्रवास…

कणकवली,ता.११: सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ व सुंदर असून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला प्रवास करताना प्लास्टिक कचरा बाहेर टाकू नये, असे आवाहन स्वच्छता मिशनच्या वतीने आज रेल्वे प्रवाशांना करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची प्रथमच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी सावंतवाडी दिवा पॅसेंजर ने रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते पुन्हा नांदगाव असा प्रवास करत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

सकाळी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांसह स्वच्छता शपथ घेऊन राष्ट्रगीत म्हणून उपक्रमाला सुरुवात केली. यावेळी स्वच्छता मिशनचे गणेश जेठे,मंडळ अधिकारी दिलीप पाटील, स्वच्छता ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर रोहित मोंडकर, पत्रकार संजय सावंत, मोहन पडवळ, तुषार नेवरेकर गुरूप्रसाद सावंत, सचिन राणे, प्रा. एम. बी.शेख , तालुकाप्रमुख प्रिया टेमकर याच्यासह स्वच्छता प्रेमी सहभागी झाले होते.

दरम्यान नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप घावरे,नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर व प्रवाशांनी सर्व स्वच्छता दूत याच्या मोहीमेत सहभाग घेतला. नांदगाव येथून रेल्वेने प्रवास सुरू झाल्यानंतर प्रत्येक रेल्वे डब्यात जाऊन प्रवाशांना स्वच्छता संदेशाचे प्रत्रक देऊन आमचा कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहेच. त्याशिवाय देशातला सर्वात स्वच्छ जिल्हा आहे. कोकण प्रांत मुळात स्वच्छ आहेच. त्यामुळे स्वच्छ कोकण यापुढेही स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई असो वा कुठचाही प्रवास करताना रेल्वेगाडीच्या खिडकीतून आपण चहाचे कप व इतर खाद्यपदार्थ व अन्नपदार्थही बाहेर फेकू नये.आपल्या डब्यामध्ये जी डस्बीन ठेवली आहेत अथवा स्टेशन वरील डस्बीनचा कृपया वापर करावा व कोकणचा निसर्ग आणि स्वच्छता कायम ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे असे स्वच्छता दूत यानी सर्व १६ ही डब्यातील प्रवाशांना संवाद साधत नांदगाव ते रत्नागिरी व पुन्हा रत्‍नागिरी ते नांदगाव असा रेल्वे प्रवास करत संदेश दिला.

यावेळी अनेक प्रवाशांनी आत्मियतेने या मोहिमेचे स्वागत करत आपण जी स्वच्छतेची देशसेवा करत आहात ती अशीच सुरू राहूदे यासाठी आम्हीही सहकार्य करू अशी ग्वाही देत संदेश मिळताच अनेकांनी आपल्या जवळील प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थ व इतर टाकावू वस्तू एका पिशवीत साठवून ठेवत असल्याचे दाखवित स्वच्छतेला आपलाही पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.यावेळी रेल्वे अधिकारी यानी या उपक्रमाचे कौतुक करत आपण सिंधुदुर्ग स्वच्छता मिशन मार्फत जो उपक्रम राबवत आहात यासाठी गौरवोद्गार काढले.