रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत सहा लाखाचे मताधिक्‍य घेणारच…

93
2
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार; विनायक राऊतांच्या लेखाजोगामध्ये एकाला तरी रोजगार मिळालाय का…?

कणकवली, ता.१५ : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला किमान सहा लाखांचे मताधिक्‍य मिळेल असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज केला. तर खासदार विनायक राऊत यांनी नुकताच पाच वर्षाचा आपला लेखाजोगा मांडला. पण या लेखाजोगामध्ये एक तरी रोजगार निर्माण करणारा उद्याेग त्‍यांनी आणलाय का? असा सवालही श्री.जठार यांनी केला.

येथील शासकीय विश्रामगृहात त्‍यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डामरे गावचे माजी उपसरपंच बबलू सावंत, काजू उत्‍पादक संघाचे अध्यक्ष राजू पवार, सदानंद चव्हाण, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, संतोष पुजारे आदी उपस्थित होते.

श्री.जठार म्‍हणाले, खासदार राऊत यांनी आपल्‍या कारकिर्दीचा लेखाजोगा मांडला. यात बीएसएनएल टॉवरची उद्‌घाटने, रस्त्यावरील पूल एवढीच कामे आहेत. या लेखाजोगामध्ये एक तरी रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे का? असा सवाल भाजप प्रदेश चिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी अाज उपस्थित केला. तसेच वक्तृत्‍व, दातृत्‍व आणि कर्तृत्‍व असलेला खासदारच कोकणचा विकास करू शकतो. केंद्राकडून हजारो कोटींचा निधी आणू शकतो, असाच महायुतीचा उमेदवार कोकणची जनता लोकसभेत पाठवणार असल्‍याचेही ते म्‍हणाले.

ते म्‍हणाले, कोकणातील काजू उत्‍पादक शेतकऱ्यांना महायुती सरकारने खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. काजू उत्‍पादक शेतकऱ्यांना प्रतिकलो १० रूपये अनुदान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्‍यासाठी ३०० कोटी रूपयांची तरतूद केली असून लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्‍या शेतकऱ्यांच्या सातबारावर पिक पाहणी नोंद आहे, त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जसे अनुदान दिले गेले, त्या धर्तीवर हा निर्णय घेतला आहे. हे अनुदान प्रतिकिलो दहा रूपये असले तरी पुढील वर्षी २० रूपये किंवा त्‍यापेक्षा अधिक देखील मागता येणार आहे. काजू अनुदानाचा विषय आमदार नितेश राणे यांच्या मदतीने लावून धरला. त्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आवाज उठवला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दिपक केसरकर यांनी १३५ किलो दर देण्याचे सांगितले असले तरी हा मार्ग लाँगटर्मचा आहे. तो पुढल्या वर्षी होईल. दरम्‍यान सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी खासदार विनायक राऊत हे आपल्‍याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. त्‍यावेळी रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारीही निश्‍चित झाली होती. मात्र भाजप पक्ष सोडणे मला योग्‍य वाटले नाही. अन्यथा राऊत यांच्या ऐवजी मीच खासदार झालो असतो आणि इथल्‍या भागाचा विकासही करून दाखवला असता असे श्री.जठार म्‍हणाले.