लोकसभेसाठी महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी सावंतवाडीत दंड थोपटले…

226
2
Google search engine
Google search engine

१ लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्णय; विकासाच्या मुद्यावर मतदारांना सामोरे जाणार…

सावंतवाडी,ता.०८: आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडूणकीसाठी महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी दंड थोपटले असून जाहीर होणार्‍या उमेदवाराला सावंतवाडी मतदार संघातून १ लाखाचे मताधिक्य देवू, विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढविली जाईल, अशी घोषणा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीचे पदाधिकारी राजन तेली आणि राजन पोकळे यांच्याकडून संयुक्तरित्या करण्यात आली. दरम्यान महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी पक्षाचे वरिष्ठ ज्या कोणाला उमेदवार म्हणून जाहीर करतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात बैठका, मेळावे घेण्याबाबत महायुतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली व पोकळे बोलत होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, उदय भोसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी , जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, अजय गोंदावळे, ॲड. निता कविटकर, विनायक दळवी, राजू निंबाळकर, राजन रेडकर, चंद्रकांत जाधव आदींसद पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. तेली म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १२ एप्रिल रोजी सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचे नियोजनही या समन्वय बैठकीत करण्यात आले. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरीही वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय घेण्यात येईल तो सर्वमान्य असेल व महायुतीचा जो उमेदवार घोषित करण्यात येईल त्याचा महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट व आर पी आय व मित्रपक्ष मिळून एकत्रित प्रचार करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विकास हाच महायुतीच्या प्रचाराचा मुद्दा असणार असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना व सर्वसामान्यांसाठी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी राजन तेली म्हणाले. या मतदारसंघात निवडणूकीची तारीख ठरली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखही निश्चित झाली आहे. तत्पूर्वी महायुतीचा उमेदवार जाहीर होणार आहे. मात्र, तोपर्यंत महायुतीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी ही समन्वय बैठक होती, अशी माहिती यावेळी राजन पोकळे यांनी दिली.