विनायक राऊत उपकार विसरले, त्यांना धडा शिकवा…

391
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; विधानसभा मतदारसंघात विकास यात्रा काढणार…

सावंतवाडी,ता.१५: खासदार विनायक राऊत यांना मी निवडून आणले. परंतू आत्ता ते उपकार विसरले आहेत आणि आम्हाला शिव्या घालत फिरत आहेत. मात्र सहानुभूतीचे भांडवल करुन हिणवणार्‍यांना आता मतदारांनी धडा शिकविणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मतदार संघात विकास यात्रा काढणार आहे. कोलगाव मतदार संघात महेश सारंग यांचे काम आणि पाठपुरावा कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
कोलगाव येथील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, महिला जिल्हा संघटक श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, गुरुनाथ पेडणेकर, प्राजक्ता केळुस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी कोकणाचा विकास साधला. उमेदवार कोणीही असो तो महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी मतदान करा. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदान दिले आहे. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा दबदबा निर्माण केला आहे.
मतदार संघ मोठा आहे. त्यामुळे आपणच उमेदवार समजून प्रत्येकाने जनतेपर्यंत जायला हवे. एक दोन दिवसात उमेदवार घोषीत होईल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आताही विकास यात्रा काढण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पाकिस्तानला मोदी सरकारने धडा शिकवला आहे. देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. जर्मनी सरकारशी करार करून नोकरी मध्ये संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेतला आहे.
यावेळी श्री. सारंग म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. उमेदवार कोणीही असला तरी नरेंद्र मोदींना मत देण्यासाठी भाजपा महायुतीने प्रचार केला पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली आहे त्यामुळे जनतेपर्यंत जाताना या विकास कामाचा उहापोह केला पाहिजे. नक्कीच महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने जनता विजयी करेल.