मातृभाषेतून शिक्षण घेऊन सुद्धा आयुष्यात यशस्वी होता येते…

263
2
Google search engine
Google search engine

दीपक पटेकर; नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार विद्यालयाचा वार्षिक शुभेच्छा सोहळा उत्साहात…

सावंतवाडी,ता.१७: मराठी शाळांमधून देखील हुशार मुले घडत असतात त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेऊन सुद्धा आयुष्यात यशस्वी होता येते, मुलांना इंग्रजी शिक्षण द्याच परंतु सोबतच मूळ पाया मातृभाषेच्या शिक्षणातून बनला पाहिजे, असे प्रतिपादन कवी लेखक दीपक पटेकर यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक शुभेच्छा सोहळा उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी आदिती दळवी, संस्थेच्या अध्यक्ष डॉ सोनल लेले, सचिव गणेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित.
यावेळी संस्थेचे सचिव गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविकात शाळेची जडणघडण आणि मुलांवर केले जाणारे संस्कार, शाळेत राबविले जाणारे उपक्रम आदींची माहिती दिली. श्री. पटेकर म्हणाले की, शिशुविहारच्या संस्थाध्यक्षा व शिक्षकांनी मुलांची करून घेतलेली तयारी नक्कीच कौतुकास्पद आहे, मराठी शाळांमधूनही अशी हुशार मुले घडतात, मातृभाषेतून शिक्षण घेऊनच आयुष्यात यशस्वी होतात. मुलांना इंग्रजी शिकवाच परंतु मूळ पाया मातृभाषेतून शिक्षण देऊन द्या असे म्हणून त्यांनी बालवाडी मधून पहिलीत जाणाऱ्या मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शुभेच्छा समारंभाच्या प्रमुख अतिथी आदिती दळवी यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमाचे आणि अध्यक्षा डॉ. सोनल लेले, संस्था सदस्य, शिक्षिका उर्मिला राणे, प्रांजल टिळवे, सहाय्यिका प्रतिभा गवळी आदी राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले, आणि मुलांना शुभेच्छा दिल्या. पालक प्रतिनिधींकडून मनोगत व्यक्त करताना ईश्वरी तेजम व पूजा धुरी यांनी शाळेतील शिक्षण, उपक्रम, शाळा घेत असलेली मेहनत आणि मुलांवर केले जाणारे संस्कार यांचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी बालवाडी मधून पहिलीत जाणारी राशी करमळकर, दीक्षा टिळवे, हर्षवर्धन तेजम, जिविका धुरी, सानवी गोसावी, मेघना ठाकूर यांना उद्घाटक दीपक पटेकर व प्रमुख अतिथी सौ.आदिती दळवी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजेत्या मुलांना देखील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. यावेळी पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या पालकांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहारला भेटवस्तू देऊन कौतुक केले.