केजरीवालांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय…

238
2
Google search engine
Google search engine

विवेक ताम्‍हाणकर; सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार…

कणकवली,ता.१०: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी आज दिली. तसेच त्यांनी पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

श्री.ताम्‍हाणकर यांनी म्‍हटले की, अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्चला अटक केली होती. मागील ५० दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन सुप्रिम कोर्टाने मंजूर केला आहे.

ते म्‍हणाले, न्यायालयाचा निर्णय हा एक संकेत आहे की देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सपशेल पराभव दिसतात ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करून भाजपच्या मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. एका खोट्या प्रकरणांत पीएमएलअे सारखे गंभीर गुन्हे लावून देखील अवघ्या ५० दिवसांत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणे ही बाब सत्याची बाजू दर्शवते. आता निवडणुकीच्या रणांगणात केजरीवाल यांच्या परिवर्तनवादी विचाराची तोफ निश्चितपणे धडाडेल आणि या देशात भाजपच्या मोदी शहांच्या हुकूमशाहीला लगाम बसेल.