कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग लावणार १० हजार झाडे… 

71
2
Google search engine
Google search engine

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची माहिती…

कणकवली,ता.१६: आंध्रप्रदेशातील राजमुद्री येथिल नर्सरीपासून प्रेरणा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली विभागामार्फत यंदा १० हजार झाडे लावून वृक्ष संवर्धनाचा संकल्प आम्ही केला आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली. ते म्हणाले, सध्याच्या काळात पर्यावरणाचे रक्षण आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लाखो झाडे लावण्याच्या दृष्टीने बांधकामच्या अवर सचिव मनीषा म्हैसकर प्रयत्नशील आहेत. त्‍यांनी बांधकाम खात्यातील सर्व विभाग प्रमुखांना आंध्रप्रदेश येथील राजमुद्री येथे जावून तेथील नर्सरी पाहून येण्याची सूचना केली. त्यानुसार माझ्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता छाया नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता ओटवणेकर, कनिष्ठ अभियंता तांबे अशा अधिकाऱ्यांनी राजमुद्री येथे असणार्‍या झाडांच्या नर्सरीला ११ मे रोजी भेट दिली.

त्या ठिकाणी सर्व प्रकारची झाडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राजमुद्री येथील नर्सरी पाहून सर्व अधिकारी भारावून गेले. आशिया खंडातील सर्वात मोठी नर्सरी त्या ठिकाणी आहे. त्याठिकाणी नर्सरी तयार करण्याचा पिढयान -पिढ्यांचा व्यवसाय आहे. झाडांच्या विविध नर्सरी पाहून आपल्या परिसरात माझ्यासह सर्वच अधिकाऱ्यांना झाडे लावण्याचा मोह झाला. त्यामुळे मी आणि माझे सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंता या वर्षी किमान १० हजार झाडे लावणार आहोत.तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. राजमुद्री येथील लोक मोठया प्रमाणात झाडे लावतात आणि जगवतात. ही बाब वाखाणण्या जोगी आहे. विशेष म्हणजे हजारो एकरावर या ठिकाणी नर्सरीमध्ये झाडे लावलेली आहेत. याठीकाणी सर्व प्रकारची झाडे ८ ते १० फुट उंचीची असून विक्रीसाठी अगदी नाम मात्र किमतीत उपलब्ध आहेत. तेथील लोकांचा आदर्श समोर ठेवून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सर्वांचे सहकार्य घेऊन कणकवली विभागातील सर्व शासकीय कार्यालयांच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात येईल. पुढील टप्प्यात इतर ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात येईल. त्यासाठी आमचे नियोजन सुरू आहे.असेही अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.