दुचाकीची एसटीला धडक, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू …

1244
2
Google search engine
Google search engine

आनंदव्हाळ येथील घटना; तिसरा गंभीर जखमी, गोव्यात उपचार सुरू…

मालवण,ता.१६: मोटरसायकल व एसटी बस यांच्यात काल रात्री आनंदव्हाळ येथे अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार – मालवण कसाल मार्गांवर आनंदव्हाळ भगवती हॉटेल नजीक वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी मालवण (एमएच २० बीइल ३१८५ ) या बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकल (एमएच ०७ एक्यू २५६८) ची धडक बसली. एसटी बसला एका बाजूला धडक देऊन मोटरसायकल रस्त्यावर कोसळली. मोटरसायकलवर बसलेले तिघेही जण रस्त्यावर कोसळले. एसटी चालक, वाहक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी धाव घेतली. रुग्णावाहिकेला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मालवण पोलीस व एसटी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करण्यातआला.
गंभीर जखमी मोटरसायकल चालक गणेश कृष्णा निकम (वय ३०) रा. पोईप यांचा काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी राकेश पवार (वय -३०) रा. कुंभारमाठ याचा आज सकाळी मृत्यू झाला. तर सुनील शिवराम पवार (वय २५) रा. कोटकमटे ता. देवगड या जखमी तरुणावर गोवा येथे उपचार सूरू आहेत. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. भरधाव वेगात मोटरसायकल चालवून अपघातात स्वतःच्या मृत्यूस तसेच मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूस व मोटरसायकल वरील अन्य एका व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.