राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत १ हजार वृक्ष लागवड…

107
2
Google search engine
Google search engine

अनिल केसरकर; मनसेचा संकल्प, जंगले टिकवण्यासाठी प्रयत्न…

सावंतवाडी,ता.०८: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिली.
वन्यप्राणी भरवस्तीत येवू नयेत यासाठी जंगले टिकवण्याच्या उद्देशाने आंबोली जंगल परिसरासह विधानसभा मतदारसंघात अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मनसेच्या वतीने येत्या १४ जूनला आंबोली जंगलपरिसरात तसेच अन्यत्र सुमारे १ हजार नवीन झाडांची लागवड करण्यात येणार असून यात काही औषधी वनस्पतींचा देखील समावेश आहे. माणसाने जंगलांमध्ये अतिक्रमण केल्यामुळे जंगली प्राणी मनुष्य वस्तींमध्ये ठाण मांडून बसले आहेत. विकासाच्या नावाखाली बेसुमार झाडांची तोड चालू असून जंगले नष्ट होत आहेत. ही जंगले, संस्कृती टिकली पाहिजे, निसर्ग व पर्यावरण याचा समतोल साधून विकासाचं चक्र गतिमान झालं पाहिजे या उद्देशाने मनसेच्या वतीने संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये नवीन झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून यात जनतेने देखील आपला सहभाग दर्शविणे गरजेचे आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व मनसे सहकाऱ्यांनी देखील आपापल्या गावात परिसरात नवीन झाडांची लागवड करावी व या समाजकार्यात नेहमीप्रमाणे आपला प्रत्यक्ष सहभाग दर्शवावा, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले आहे.