सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिवंतांची खाण, मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी मागे…

94
2
Google search engine
Google search engine

महेंद्र पेडणेकर; गुणवत्तेबरोबरच वेळेचे नियोजन व अपार कष्ट करण्याची गरज…

सावंतवाडी,ता.१०: सिंधुदुर्ग जिल्हा हा बुद्धिवंतांची खाण मानला जातो, मात्र राज्यात गुणवत्तेत प्रथम असणारे इथले विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा बोलबाला निर्माण करण्यासाठी गुणवत्तेबरोबरच वेळेचे नियोजन व अपार कष्ट करण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महेंद्र अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती मार्फत येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पेडणेकर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष केशव जाधव, महेश परुळेकर, रामचंद्र जाधव, सगुण जाधव, भालचंद्र जाधव, रवी जाधव, विवेक वाळके, जगदीश चव्हाण, विनायक जाधव, भावना कदम, मीनाक्षी तेंडुलकर, विनायक कांबळे, मधुकर जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी आयटीआय चे निर्देशक रामचंद्र जाधव यांनी सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आयटीआय चे विविध अभ्यासक्रम सांगून त्यासाठी लागणारी पात्रता व त्यातून मिळणाऱ्या विविध संधी याबाबतचे मार्गदर्शन केले. तर विनायक जाधव यांनी बरर्टी सारथी यासारख्या संस्थांचे आपल्या जिल्ह्यात केंद्र व्हावे असे आवाहन करून इंजिनिअरिंग व त्या अनुषंगाने अभ्यासक्रम इत्यादींचे मार्गदर्शन केले. यावेळी जगदीश चव्हाण महेश परूळकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना केशव जाधव यांनी या कार्यक्रमात सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा अगत्यपूर्वक उल्लेख करून भविष्यात आपल्या समाजातील मुलांनी मोठी पदे ग्रहण करून समाज बांधिलकी ठेवावे असे आवाहन केले.