आंबोली घाटात सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी…

1090
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांकडून प्रकार उघड; वनविभागाच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह…

सावंतवाडी,ता.१०: जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आंबोली घाटात काही परप्रांतीय लोकांकडून कॅन्सर सारख्या आजारावर औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी केली जात आहे. हा प्रकार करणाऱ्या तस्करांना काल रंगेहात वनविभागाच्या पथकाकडून पकडण्यात आले. ही कारवाई नानापाणी परिसरात करण्यात आली. मात्र याबाबत पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे तस्करी करणाऱ्या व वनौषधींचा ठेवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित तस्करांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी तसेच हे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ते प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार नानापाणी परिसरात काही व्यक्तींनी घाटात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पतीची तोड केली आहे. हा प्रकार गेले अनेक दिवस सुरू आहे. याबाबतची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्या ठिकाणी येऊन संबंधित तस्करांना रंगेहाथ पकडले. मात्र त्यांच्यावर पुढे नेमकी कोणती कारवाई झाली? याबाबत माहिती मिळू शकली नाही. सुरू असलेल्या प्रकार अत्यंत निंदनिय आहे. आंबोली घाट हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी नैसर्गिक ठेवा आहे. त्यामुळे अशा प्रकारे तस्करी झाल्यास त्याचा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत लवकरात-लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत आंबोली वनविभागाशी संपर्क साधला असता. झालेली तोड ही मालकी क्षेत्रात करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती आणि ठेकेदाराचे जाब-जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. जलपर्णी जप्त करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.