नुसती वसूली नको, वीज ग्राहकांना चांगली सेवा द्या…

366
2
Google search engine
Google search engine

लोकप्रतिनिधी आक्रमक; सावंतवाडीच्या विज अधिकाऱ्यांना विचारला जाब…

सावंतवाडी,ता.१०: तालुक्यात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून साधी फ्युज किंवा फ्युजची तार सुद्धा अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत, पोल आणि वीज वाहिन्या गांजलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. अधिकारी केवळ आश्वासने देऊन ग्राहकांना गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करीत नुसती वसूली करू नका, तर चांगली सेवा द्या, अन्यथा बिले भरणार नाही, अशी भूमिका आज माडखोल, निगुडे, कास, मळगाव, तळवडे येथील लोकप्रतिनिधींनी घेतली.

दरम्यान झाडे-झुडपे तोडली नसल्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे. पोल वीज वाहिन्या गंजलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक सोडा वीज कंपनीचे कर्मचारी त्या ठिकाणी अपघात ग्रस्त होत आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्या, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि लोकप्रतिनिधींनी आज येथील वीज कंपनीचे अधिकारी कुमार चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. यावेळी तालुक्यात विविध ठिकाणी विजेच्या समस्या असून त्याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच किंवा लोकप्रतिनिधींनी आपल्या गावातील विविध प्रश्न चव्हाण यांच्या समोर मांडले.

यावेळी काही झाले तरी लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा, या ठिकाणी अपघात होत आहेत ते रोखण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा याचा गंभीर परिणाम आपल्याला सहन करावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी विद्युत ग्राहक सावंतवाडी संघटना अध्यक्ष संजय लाड, रोनापाल माजी सरपंच सुरेश गावडे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, निगुडे माजी सरपंच शांताराम गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, उपसरपंच मडुरा बाळू गावडे, माजी उपसरपंच निगुडे गुरुदास गवंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सावंतवाडी पुंडलिक दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष तळवडे बाळा जाधव, मोहन गवस, भगवान परब, संतोष तावडे, जिल्हा उपाध्यक्ष वीज ग्राहक दीपक पटेकर, मनोज घाटकर, श्रीराम आगरवडेकर आदी उपस्थित होते.