मनीषच्या मृत्यूला जबाबदार ठरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा…

681
2
Google search engine
Google search engine

सर्वपक्षीयांची मागणी; ठेकेदारासह बांधकाम अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी…

सावंतवाडी,ता.१२: जेसीबीच्या धडकेत अपघाती मृत्यू झालेल्या मनीष देसाई याच्या मृत्यूला जेसीबी चालकासह ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप करीत या प्रकरणात त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांकडे करण्यात आली.

या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने हईगईने काम केल्यामुळे हा प्रकार घडला व झालेल्या अपघातात एक निष्पाप जीव गेला. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची भेट घेण्यात आली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनीष देसाई या मुलाचा ३ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मात्र या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी तक्रार केल्यानंतर आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कांबळे यांना घेराव घालत जाब विचारला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती एकनाथ नाडकर्णी, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, राजू धारपवार, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, शब्बीर मनियार, शैलेश गंवडळकर, तुषार तुळसकर, सॅमी गांवकर आदी उपस्थित होते.