फोंडाघाट ग्रामपंचायतीचे ग्रामरोजगार सेवक श्रीकृष्ण तावडे यांचे उपोषण स्थगित…

95
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता. १९ : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर फोंडाघाट ग्रामपंचायतीचे ग्रामरोजगार सेवक श्रीकृष्ण उर्फ भाई दामोदर तावडे यांनी मंगळवारी सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी तूर्तास आपले उपोषण स्थगित केले आहे.

कणकवली पंचायत समिती कार्यालयातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रोजगार सेवकांची अडवणूक होत आहे. याबाबत गटविकास अधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथील पंचायत समिती कार्यालयासमोर फोंडाघाट ग्रामपंचायतीचे ग्रामरोजगार सेवक श्रीकृष्ण उर्फ भाई दामोदर तावडे यांनी मंगळवार पासून आमरण उपोषण सुरू केले होते.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयीन कामानिमित्त जिल्ह्याबाहेर गेल्याने ग्रामविस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी भाई तावडे यांची भेट घेतली. तसेच गटविकास अधिकारी कणकवलीत दाखल झाल्यावर तावडे यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून वरिष्ठांकडे त्या मागण्या मांडण्यात येतील .असे आश्वासन दिले.त्यामुळे तावडे यांनी आपले आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तावडे यांच्या मागण्या जाणून घेतल्या.तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर तावडे यांनी उपोषण स्थगित केले.