धनलक्ष्मी घ्या, पण उद्रेक दाखवून द्या, पदवीधरांना आवाहन…

154
2
Google search engine
Google search engine

आमदार डावखरे निष्क्रिय; महाविकास आघाडीच्या नेत्यांची टीका…

कणकवली, ता.२० : लोकसभा निवडणुकींप्रमाणेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही प्रचंड प्रमाणात पैसे वाटले जातील. पदवीधर बेरोजगारांनी या धनलक्ष्मीचे दर्शन घ्यावे. पण त्‍याला बळी न पडता तुमच्यातील उद्रेक मतदानातून दाखवून द्या, असे आवाहन शिवसेना नेते सतीश सावंत यांनी आज केले. तर निरंजन डावखरे हे सर्वांत निष्क्रिय आमदार असल्‍याची टीका महाविकास आघाडीतील नेत्‍यांनी केली.

पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्या निवडणूक प्रचारार्थ कणकवलीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यात काँग्रेस जिल्‍हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना ठाकरे पक्षाचे सतीश सावंत, जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर, आप जिल्‍हाध्यक्ष विवेक ताम्‍हाणकर, युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक, राष्‍ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते.

श्री. सावंत म्‍हणाले, राज्‍य आणि केंद्र सरकारने बेरोजगारांची मोठी फसवणूक केली आहे. अनेक वर्षे नोकर भरती झालेली नाही. पटसंख्येअभावी शाळा, विद्यालये बंद होत असल्‍याने पदवीधर शिक्षकांपुढे बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नीट परीक्षेत प्रचंड घोटाळा झाला. याबाबत पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कधीही आवाज उठवलेला नाही. दर सहा वर्षांनी अहवाल पाठवणे एवढेच काम ते करत आहेत. त्‍यामुळे बेरोजगारांनी आपला तीव्र उद्रेक मतपेटीतून दाखवून द्यावा आणि काँग्रेस आघाडीचे रमेश किर यांनाच मोठ्या मताधिक्‍याने निवडून द्यावे.
इर्शाद शेख, संदेश पारकर, सुशांत नाईक, विवेक ताम्‍हाणकर यांनीही डावखरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच रमेश किर हेच निवडून येणार असल्‍याची ग्‍वाही दिली.