चार मंत्री असताना दबाव टाकावा लागला, हाच भाजपचा पराभव…

382
2
Google search engine
Google search engine

वैभव नाईक; त्यावेळी निलेश राणेंची भूमिका काय असेल, याची वाट बघतोय…

कुडाळ,ता.२०: जिल्ह्यात चार मंत्री असताना सुद्धा लोकसभा निवडणुकीत मतदान होण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लोकांवर दबाव टाकण्याची वेळ आली यातच त्यांचा पराभव आहे, असा टोला आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला. दरम्यान या ठिकाणी लवकरच विधानसभा जाहीर होणार आहेत, त्यावेळी कुडाळ मधून इच्छुक असलेल्या निलेश राणेंचा पत्ता भाजप कट करेल त्यावेळी पक्षाबद्दल त्यांची भूमिका काय असेल, याची आम्ही वाट बघतोय असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

आमदार नाईक यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केली. नाईक यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल त्यांची माफी मागितली होती. त्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली होती. तोच मुद्दा पकडून आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत आपली मते स्पष्ट केली. नाईक म्हणाले, लोकशाहीत या लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. या पराभवासाठी विनायक राऊत यांची माफी आम्ही मागितली आहे. कारण मतदानापूर्वी २ ते ३ दिवस या मतदार संघात जो प्रकार सुरु होता तो प्रकार शिवसैनिक म्हणून आम्ही थांबवू शकलो नाही. पण या माफीबद्दल काही लोक प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. पण त्या लोकांनी लोकांची माफी मागितली पाहिजे. कारण हा मतदारसंघ प्रा. मधू दंडवते, बॅ नाथ पै, सुरेश प्रभू अशा खासदारांचा होता. विनायक राऊत यांनी सुद्धा त्यांचाच वारसा चालवला. परंतु या मतदार संघामध्ये लोकसभा निवडणुकीत जे झाले ते सर्वांना माहित आहे. लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याबद्दल निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे. त्याच बरोबर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची सुद्धा माफी मागितली पाहिजे. पण तेवढे त्यांचे मन मोठे नसेल. कारण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महाराष्ट्रातले अनेक स्वाभिमानाचे कार्यकर्ते गावागावात आणून आपल्याच कार्यकर्त्यांवर त्यांनी अविश्वास दाखविला. त्याबद्दल निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे. असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

खासदार नारायण राणे यांच्या वर टीका करताना आमदार वैभव नाईक म्हणाले, राणे ४ वर्षे केंद्रीय मंत्री होते. असे असताना त्यांना केवळ सिंधुदुर्गातच मताधिक्य मिळाले. म्हणून त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले कि काय? हा खरा प्रश्न असल्याचे आमदार नाईक म्हणाले. येत्या निवडणूका ताकदीने लढवू असे सांगून आमदार वैभव नाईक म्हणाले, आमच्यावरचा लोकांचा विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. भारतीय जनता पक्षाचे चारचार मंत्री या जिल्ह्यात असताना सुद्धा त्यांना लोकांवर दबाव का टाकावा लागला ? जे व्हिडीओ आले ते का व्हायरल झाले ? याचे खरेतर आत्मपरीक्षण करून त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी सांगावे कि आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. यावेळी लोकांवर दबाव टाकण्याचे काम भाजपने केले. पण येणाऱ्या निवडणुकात लोकांत दबाव असणार नाही, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

राज्यांची विधान परिषदेची निवडणूक आहे, पण त्या चाळीस आमदारांबाबत निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी उद्धव ठाकरे यांची मागणी आहे. याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार वैभव नाईक म्हणाले, आपला पक्ष या विरोधात कोर्टाची लढाई लढत आहे.त्यामुळे हा निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा आमदार नाईक आणि व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर त्यांना कोकणात पाऊल ठेऊ देणार नाही, या आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, उद्धव ठाकरे लवकरच विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. लोकसभेला भाजपने मोदींवर मते मागितले होती आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर मते मागितली. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. त्यासाठी ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यावेळी आमदार नितेश राणे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे याना अडवून दाखवावे, असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले. सगळ्या विरोधाला सामोरे जात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून ३० जागा लोकसभेसाठी निवडून आणल्या. राहुल गांधी, शरद पवार यांनी देखील त्याचे श्रेय त्यांना दिले आहे. त्यामुळे आम्हाला कोणाच्या प्रशस्तिपत्रकाची गरज नसल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

लोकशाहीमध्ये चुकीची पद्धत राबवून निवडणूक लढवली गेली त्याबद्दल विनायक राऊत यांनी नोटीस पाठवली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी सांगितले. येणाऱ्या काळात लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिथे आम्ही कमी होतो तिथे जोरदार प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा या विधानसभा मतदारसंघात आमचा भगवा फडकवू असे आमदार नाईक यांनी सांगितले. या सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका रोखून धरल्या आहेत. पंचायत समितीच नसल्याने आमसभा कशी घेणार ? त्यामुळे मी आमसभा घेतल्या नाहीत हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून विरोधकांनी माहिती घेऊन आरोप करवते अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी केली. येणाऱ्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल. त्यावेळी जेव्हा तुम्हाला भाजपचे तिकीट नाकारले जाईल त्यावेळी तुमची भाजपबद्दल काय भूमिका असेल याची आम्ही वाट बघतोय असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री असताना नारायण राणे यांनी २५ हजार युवकांना आपण जर्मनीत पाठवणार असल्याचे सांगितले होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर म्हणले होते कि शिक्षकांची सर्व पदे भरणार. पण आज पन्नास टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. सर्व मुलांना शालेय गणवेश वाटप झाले नाही. कृषी क्षेत्राविषयी उदासीनता आहे. हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. संदेश पारकर लवकरच आपला राजीनामा मागे घेतील असे ते शेवटी म्हणाले.