शाळेच्या आवारात गाडी लावल्याची विचारणा केल्याच्या रागातून युवकाला मारहाण…

1663
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील घटना; दोघा विरोधात गुन्हा दाखल, पाठलाग करुन मारहाण केल्याचा आरोप…

सावंतवाडी,ता.२७: शाळेच्या आवारात गाडी लावल्याची विचारणा केल्याच्या रागातून शहरातील एका युवकाला रस्ता अडवून मारहाण केल्याचा प्रकार आज येथे घडला. अमित सायमन डिसोझा (वय ४१, रा. भटवाडी) असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गौरेश कामत आणि गणेश काळसेकर (दोघे रा. सावंतवाडी) या दोघांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तक्रारदार डिसोझा याने दिलेल्या फिर्यादीनुसार यातील गुन्हा दाखल झालेले दोघे संशयित येथील एका शाळेच्या आवारात विना परवाना गाडी घेवून गेले होते. यावेळी त्या ठिकाणी असलेले कर्मचारी रॉबिन डिसोझा यांनी त्यांना विचारणा केली. यावेळी दोघांनी रॉबिन यांच्याशी वाद घातला. यावेळी बाजूला असलेल्या फिर्यादी अमित आणि त्यांचे बंधू अ‍ॅथोनी हे फोनवर बोलत होते. यावेळी ते दोघे आपले मोबाईलवर शुटींग करीत आहे, असा गैरसमज झाल्याने त्यांचा फोन काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच त्यांना धक्का देवून खाली पाडले. दरम्यान यावेळी फिर्यादी हे झालेल्या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात माहिती देण्यासाठी येत असताना त्या दोघांनी त्यांच्या गाडीसमोर येत त्यांची वाट अडविली तसेच त्यांना हाताच्या थापटाने आणि ठोशाने मारहाण करुन त्यांच्या डोळ्याला व डाव्या पायाच्या गुडघ्यावर, अंगठ्यावर दुखापत केली. यात फिर्यादी अमित यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली आहे, अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार कामत आणि काळसेकर या दोघांवर वाट अडवून मारहाण करणे तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी दिली.