पंचायत समितीवर लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीं मध्ये अपहार…

80
2
Google search engine
Google search engine

अनिल केसरकरांचा आरोप; पावसाळी अधिवेशनात योग्य ती दखल घेण्याची मागणी…

सावंतवाडी,ता.२७: जिल्ह्यातील पंचायत समितीवर गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात अपहार होत आहेत. तळवडे ग्रामपंचायत मध्ये झालेला अपहार त्याचाच एक भाग आहे. असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांनी या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधून लवकरात लवकर निवडणूका होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत त्यांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे एका ग्रामसेवकाकडे दोन ग्रामपंचायतींचा चार्ज देण्यात आला आहे. परंतु ग्रामसेवक या आपल्या सरकारी वेळेत हजार न राहता कधी येतात कधी जातात, याचा फटका गोरगरीब जनतेला सहन करावा लागत आहे. दुपारी जेवणाच्या नावाखाली अनेकदा ग्रामपंचायत कार्यालये बंद केली जातात. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी उपोषणे केल्यानंतर तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला बायोमेट्रिक प्रणाली वापरण्यास सांगितले होते, परंतु अजून पर्यंत बायोमेट्रिक प्रणाली का वापरली जात नाही? यामध्ये काही अधिकाऱ्यांचे साठे-लोटे आहेत का? असा सवाल देखील केसरकरांनी उपस्थित केला आहे.

आज राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्याचप्रमाणे पंधराव्या वित्त आयोगामधून अनेक ग्रामपंचायतींनी बोगस वस्तू खरेदी केल्या आहेत आणि त्याच्यावर आय. सी. आय मार्क चे स्टिकर लावले जात आहेत. याला ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सचिव जबाबदार आहेत. लवकरच आम्ही काही अशा वस्तूंचा भांडाफोड करणार आहोत, त्यामुळे नव्याने आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख यांनी या बाबत कठोरात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे जोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लागत नाही. तोपर्यंत प्रशासन आणि अधिकारी मात्र जनतेला वेटीस धरण्याचे काम करणार आहोत, असे यात म्हटले आहे.