सिंधुदुर्ग आरटीओच्या विरोधात १५ जुलैला आंदोलन छेडणार…

238
2
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकरांचा इशारा; जिल्ह्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप…

सावंतवाडी,ता.२८: जिल्ह्यातील महामार्गावरील होणारी विना परवाना प्रवासी व अवजड वाहतूक रोखण्याबाबत सिंधुदुर्ग आरटीओ कडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे १५ जुलै पासून आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर व सिंधुदुर्ग ड्रायव्हर असोसिएशन यांच्याकडून जिल्हा आरटीओ अधिकारी नंदकिशोर काळे यांना देण्यात आला आहे.

याबाबत त्यांनी आज आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्याबाबत पुन्हा एकदा ४ जुलैला शिष्टमंडळासमवेत अधिकाऱ्यांना भेटणार आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास आपण आंदोलनावर ठाम आहोत, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. महामार्गावरून ओव्हरलोड सामान वाहतूक केले जात आहे. तसेच विनापरवाना प्रवासी वाहतूक केली जात आहे. यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, खाजगी बसचे ड्रायव्हर मद्यपान करून वाहने चालवतात. त्याचप्रमाणे विमा व पासिंग नसलेल्या गाड्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करत असतात, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

त्यासोबतच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वाहतूक कायद्याअंतर्गत येणारे वाहतूक नियमांचे बोर्ड अद्यापही लावले गेले नाहीत. त्याचप्रमाणे आंबोली घाटातून जाणाऱ्या अवजड चिरे वाहतुकीवर वारंवार मागणी करूनही तात्पुरती कारवाई केल्याचा दिखाऊपणा केला गेला. त्यामुळे यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांबाबत ४ जुलैला शिष्टमंडळासहित भेट घेणार असून भेटीअंती प्रश्न न सुटल्यास १५ जुलैला आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, सिंधुदुर्ग ड्रायव्हर असोसिएशन अध्यक्ष विजय जांभळे, आप्पा मांजरेकर, गिरगोल दिया, रघुनाथ खोटलेकर, आबा चिपकर अभिजीत पेडणेकर, मनोज धुमाळे, संदेश सावंत, मनोज कांबळे आदी उपस्थित होते.