सर्जेकोट वासीयांची वीज प्रश्नी महावितरणच्या कार्यालयावर धडक…

145
2
Google search engine
Google search engine

अधिकाऱ्यांना धरले धारेवर; समस्या न सुटल्यास १५ जुलै नंतर मोर्चा काढण्याचा इशारा…

मालवण,ता.२८: तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबांदा गावात सतत खंडीत होणारा आणि कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लक्ष वेधूनही महावितरण कंपनी लक्ष देत नसल्याने आज सुमारे ६० ते ७० ग्रामस्थांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत वीज अभियंत्यांना जाब विचारला. सर्जेकोट येथील वीज समस्या सोडवून वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच आणखी एक ज्यादा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी करत १५ दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास १५ जुलै नंतर कधीही बहुसंख्य ग्रामस्थांचा मोर्चा महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देईल असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.

सर्जेकोट मिर्याबांदा गावातील वीज समस्यांबाबत आज सकाळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थांनी येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी कृष्णनाथ तांडेल, प्रभारी सरपंच सुनील खवणेकर, प्रसाद पाटील, भालचंद्र पराडकर, नितीन परुळेकर, जयवंत केळूसकर, भारती आडकर, स्नेहा शेलटकर, शैलेश खंडाळेकर, दाजी कोळंबकर, बाळ आंबेरकर, गंगाराम आडकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी महावितरणच्या अभियंत्यांकडे ग्रामस्थांनी वीज समस्यांचा पाढा वाचला. सर्जेकोट मिर्याबांदा येथे दोन वीज ट्रान्सफॉर्मर असून त्यावरून कमी दाबाचा वीज पूरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच ट्रान्सफॉर्मर आणि वीज लाईन वरील झाडी तोडण्यात आलेली नाही. यामुळे अनेकवेळा स्पार्किंग होऊन गावातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. या समस्येबाबत गेली दहा वर्षे महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. म्हणूनच आज ग्रामस्थांना मोठ्या संख्येने महावितरणच्या कार्यालयावर धडक द्यावी लागली, असे यावेळी ग्रामस्थांनी आक्रमकपणे सांगितले. कमी दाबाचा वीज पूरवठा होत असल्याने आणखी एक ज्यादा ट्रान्सफॉर्मर गावात बसविण्यात यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

यावेळी महावितरणचे अभियंता हितेश गायकवाड यांनी सर्जेकोट गावातील वीज समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन ग्रामस्थाना दिले. येत्या १५ दिवसात गावातील वीज समस्या सोडविण्यात याव्यात, अन्यथा १५ जुलै नंतर कधीही बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत वीज कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.