सावंतवाडीत केसरकर नको, कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवूया…

477
2
Google search engine
Google search engine

राजन तेली; सतत पक्ष व भूमिका बदलल्यामुळे मतदार नाराज असल्याचा दावा…

सावंतवाडी,ता.२९: दीपक केसरकर यांनी चार पक्ष बदलल्यामुळे तसेच वारंवार आपली भूमिका बदलल्यामुळे त्यांच्याबाबत जनतेत नाराजी आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांना भाजपकडून संधी न देता सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपच्या कमळ चिन्हावर लढविण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.दरम्यान मंत्री दीपक केसरकर हे भाजप कार्यकर्त्यांच्या भरोशावर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचा एकही कार्यकर्ता आलेला नाही. शिवसेनेचा मूळ मतदार जैसे थे आहे. त्यामुळे याबाबत विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

श्री. तेली यांनी आज याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र दिले आहे. यात असे म्हटले आहे की, मंत्री दीपक केसरकर हे भाजप कार्यकर्त्यांच्या भरोशावर विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. त्यांच्यासोबत मूळ शिवसेनेतील कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आलेले नाही. हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. या मतदारसंघात शिवसेना गटाच्या उमेदवारांना ५३ हजार ५९३ एवढी मते पडली आहेत. याचा अर्थ शिवसेनेचा मतदार जैसे थे आहे. केसरकरांच्या बद्दल या मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. भाजपने हा मतदारसंघ २०१४ पूर्वी कधीही लढवला नव्हता. युतीच्या वाटाघाटीत अगदीच ३ जिल्हा परिषद किंवा ४ ते ५ पंचायत समिती एवढेच मतदारसंघ लढविले जात होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यात आमची सर्व सत्ता स्थाने आहेत. ७० टक्के ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत. तसेच या मतदारसंघात १७ पैकी १३ जिल्हा परिषद सदस्य व ३४ पैकी २८ पंचायत समिती सदस्य हे भाजपचे आहेत. त्या मतदारसंघात असलेले तीनही नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आहेत. बहुतांश खरेदी-विक्री संघ, सोसायटी या आमच्या ताब्यात आहेत. त्यामुळे याबाबत पुनर्विचार करावा.

श्री. केसरकर यांनी आजपर्यंत मतदारसंघातील कोणतेही काम केले नाही. अनेक आश्वासन दिली. मात्र ती पूर्ण केली नाही. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. चार पक्ष आणि सतत आपली भूमिका बदलल्यामुळे मतदार संघातील जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. केसरकर हे प्रथम नारायण राणे यांचा आधार घेऊन कोणताही बेस नसताना आमदार झाले. त्यानंतर दहशतवादाचा मुद्दा पुढे करून ते पुन्हा आमदार झाले. आता भाजप मतदारांचा आधार घेऊन ते पुन्हा एकदा लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा श्री. तेली यांनी केला आहे. याबाबत त्यांनी तब्बल ६ पानांचे पत्र बावनकुळे यांना दिले आहे.