शाळेचा वेळ बदलण्याबाबत नक्कीच पुनर्विचार करू….

618
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; टर्मिनससाठी १० कोटी, वंदे भारत थांबण्यासाठी प्रयत्न…

सावंतवाडी,ता.२९: आता शनिवारची शाळा असणार नाही, तरिही पालक व विद्यार्थ्यांची मागणी असेल तर शाळेचा वेळ बदलण्याबाबत नक्कीच पुनर्विचार केला जाईल, आवश्यक असल्यास तसा अध्यादेश काढू, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे मांडली. दरम्यान सावंतवाडी टर्मिनस उभारण्यासाठी १० कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. तर आगामी काळात सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर वंदे भारत थांबण्यासाठी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

श्री. केसरकर हे आज सावंतवाडी अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. यावेळी शाळेची वेळ बदलल्यामुळे अनेक पालकांत नाराजी आहे. त्यामुळे या बदलत्या वेळेबाबत पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी आहे. याबाबत उपस्थित पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले. यावेळी याबाबत आपण नक्कीच पुनर्विचार करू, शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय अद्याप पर्यंत झालेला नाही. पालकांकडून तशा प्रकारच्या सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. मुलांना सकाळी लवकर उठणे शक्य होत नसल्यामुळे शाळेची वेळ बदलली होती. परंतु पालकांच्या तक्रारी असतील तर नक्कीच त्यावर पुनर्विचार केला जाईल, आवश्यक असल्यास तसा शासन अध्यादेश काढू असे ते म्हणाले.

यावेळी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्याबाबत श्री. केसरकर यांनी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले आपण यासाठी प्रयत्न केले. दिल्ली येथे जाऊन रेल्वेमंत्र्यांची बैठक घेतली, मात्र आता नारायण राणे यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करणार आहेत. भविष्यात नक्कीच या ठिकाणी सावंतवाडीत वंदे भारतला थांबा मिळेल दुसरीकडे टर्मिनस भरण्यासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यात वेटिंग रूम कार्यालय आदी उभारण्यात येणार आहे. लवकर हे काम हाती घेण्यात येणार आहे.