इच्छा असून ही अर्बन बँक वाचवू शकलो नाही, याचे दुःख…

322
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; विलीनीकरणानंतर बँकेला चांगले दिवस प्राप्त होतील…

सावंतवाडी,ता.२९: गेल्या ७७ वर्षाची परंपरा आणि सावंतवाडीचे नाव असलेली अर्बन बँक टीजेएसबी बँकेत विलीनीकरण होत आहे. याचे दुःख नक्कीच आहे. या बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी ७ ते ८ कोटीच्या ठेवी आणून आपण प्रयत्न केले. परंतू ते निष्फळ ठरले, अशी खंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केली. या बँकेसह राज्यातील आणखी २४७ बँकाना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र आरबीआय कडून कमी मुदत देण्यात आल्यामुळे काही करू शकलो नाही. मात्र आता विलीनीकरणानंतर बँकेला चांगले दिवस प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. केसरकर यांनी आज सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आज अर्बन बँकेला भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष सुभाष पणदूरकर, तानाजी वाडकर, उमाकांत वारंग, राजू पनवेलकर, प्रेमानंद देसाई, अर्पणा कोठावळे, रमेश बोद्रें, मृणालीनी कशाळीकर, राजन पोकळे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, अर्बन बँकेला उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी मी तब्बल ७ ते ८ कोटी रुपयांच्या ठेवी बाहेरून आणून दिल्या. परंतू ती रक्कम कर्मचार्‍यांचे पगार आणि अन्य गोष्टीवर खर्च झाली तर दुसरीकडे १०० कोटीच्या ठेवी गोळा करा, असे आदेश आरबीआयने दिल्यामुळे तसेच अत्यंत कमी मुदत दिल्यामुळे इच्छा असून सुध्दा बँक विलीनीकरण होण्यापासून वाचवू शकलो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.