आंबोली घाटातून होणारी अनधिकृत अवजड वाहतूक रोखणार…

140
2
Google search engine
Google search engine

मिलिंद सावंतांचा इशारा; मनसेची दाणोली पोलिसांना सहकार्याची तयारी…

बांदा,ता.३०: वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातून होणारी अनधिकृत अवजड वाहतूक रोखण्यासाठी दाणोली चेक पोस्ट येथे राहून मनसे पोलिसांना मदत करणार आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान त्या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांना अनधिकृत वाहतूक करणारे चालक जुमानत नसतील तर पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, पावसाळ्याच्या दिवसात आंबोली घाट मार्गे अवजड वाहतूक नियमानुसार बंद कालावधी असताना सुद्धा या घाट मार्गे दहा चाकी, बारा-चौदा चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात आंबोली येथील धबधबे प्रवाहीत झाल्यावर या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी पूर्ण राज्यातून तसेच शेजारील गोवा व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यात या अवजड वाहनांमुळे आंबोली मुख्य धबधबा या ठिकाणी कोंडी होत असल्याने त्या ठिकाणच्या स्थानिक व्यावसायिक तसेच बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांवर ट्राफिकचा फार मोठा ताण पडत असतो. अशाप्रकारे अनधिकृतित्या बेदरकारपणे होणारी अवजड वाहतूक करणारे पोलीस प्रशासनास जुमानत नसतील तर येत्या दोन दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक दाणोली चेक पोस्ट जवळील पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा श्री. सावंत यांनी दिला आहे.