“बँक सखी” च्या माध्यमातून आता जिल्हा बँकेची घरोघरी सेवा…

203
2
Google search engine
Google search engine

मनीष दळवी; यावर्षी ३५० कोटी रूपयाचे शेती कर्ज देण्याचे उद्दिष्ट…

ओरोस,ता.०१: ग्राहकांना सिंधुदुर्ग बँकेत यावे लागू नये तसेच महिला पर्यंत वेगाने सेवा पोहोचावी यासाठी “बँक सखी” नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून घरोघरी सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती आज येथे आयोजित कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. दरम्यान दरवर्षी २५० कोटी रुपयांची शेती कर्ज वितरित करण्यात येते. मात्र हा आकडा आता ३५० कोटीच्या घरात न्यायचा आहे. त्यासाठी ग्राहकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ४१ वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, व्हिक्टर डांटस, बाबा परब यांच्यासह अधिकारी, पिग्मी एजंट आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. दळवी पुढे म्हणाले, आपली जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे. तिची घौडदौड कायम ठेवण्यासाठी. आमचा एक प्रामाणिक प्रयत्न चालला आहे. या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी, जिल्हा वासीयांनी साथ द्यावी, अशा प्रकारचे एक आव्हान आपण या निमित्ताने करतो. तसेच आपण आतापर्यंत टाकलेल्या विश्वास निश्चितपणे यापुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सार्थकी लावू अशा प्रकारचे ग्वाही आपण या निमित्ताने देतो. याच प्रमाणे वंचित आणि खावटी कर्ज माफी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही आश्र्वासित केले.
यावेळी ज्येष्ठ संचालक व्हिक्टर डांटस म्हणाले, जिल्हा बँकेच्या यशस्वीतेचे सिंधुदुर्ग वासियांना श्रेय जाते. मनीष दळवी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर खूप नवीन योजना आणल्या आहेत. सुविधा निर्माण केल्या आहेत. संचालक मंडळाच्या सहकार्याने ही बँक पुढे जात आहे, असे सांगत असेच सहकार्य यापुढे बँकेच्या सर्व घटकांनी करावे, असे आवाहन केले.