विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे…

57
2
Google search engine
Google search engine

लखमराजे भोसले; बांदा मराठा समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव उत्साहात…

बांदा,ता.०१: विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षण पूर्ण करुन तुम्ही पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणार त्याठिकाणी तुम्ही गुणवत्तेत कमी पडू नये यासाठी आतापासूनच तुमच्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही उंचावला पाहिजे, असे मत सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी बांदा मराठा समाज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तालुका मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, सावंतवाडी मराठा समाज समन्वयक मकरंद तोरसकर, बांदा उपसरपंच तथा माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, मराठा समाज अध्यक्ष विराज परब, बांदा मराठा समाज महिला अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, यशस्वी उद्योजक तथा माजी उपाध्यक्ष आनंद गवस, माजी सचिव म. गो. सावंत, उद्योजक नारायण गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
लखमराजे भोसले म्हणाले कि, पुढील शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतील आणि या परिक्षेच्या अभ्यासासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. तरच भविष्यात तुमच्या पालकांचे तुमच्या बद्दलचे स्वप्न पुर्ण होईल. आपल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कोणतेही अडचण भासल्यास आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सीताराम गावडे म्हणाले कि, आतापासूनच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन त्या ध्येया प्रमाणे परिश्रम घेतले पाहिजे. तरच तुमचे शिक्षणाचे पुढील उद्दिष्ट पुर्ण होण्यास सोपे होईल. शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक अडचणी येत असतात. या अडचणीवर मात करून जो विद्यार्थी पुढे जातो तो आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचतो. बांदा मराठा समाज मंडळ गेली अनेक वर्षे अशा पद्धतीने मराठा समाजातील बांधवांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. खरोखरच या मंडळाचे कार्य स्तुत्य असल्याचे श्री गावडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बांदा मराठा समाज सचिव आनंद वसकर म्हणाले बांदा मराठा समाज गेली दहा वर्षे दशक्रोशितील मराठा बांधवांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मराठा दाखला शिबीर, आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार, पुरग्रस्तासाठी मदत, असे उपक्रम राबविले गेले. यापुढे या मंडळाचे कार्य असेच पुढे चालू रहाणार असल्याचे सांगितले.
यावेळी लखमराजे भोसले, सिताराम गावडे, आनंद गवस, नारायण गावडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजाराम उर्फ बाळू सावंत, विराज परब, गुणवंत विद्यार्थी प्रणव नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी, नवोदय विद्यालय निवड, टेलेंट सर्च परिक्षेत यशस्वी व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा भेट वस्तू, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सहसचिव हेमंत मोर्ये, खजिनदार महेश मोर्ये, मिलिंद सावंत, रत्नाकर आगलावे, राकेश परब, सचिव आनंद वसकर, ग्रा.पं. सद-या सौ. रेश्मा सावंत, राखी कळगुंटकर, माधवी गाड, ममता सावंत, रिना मोरजकर, दिक्षा सावंत, लक्ष्मण पावसकर, माजी सरपंच दिपक सावंत, हनुमंत सावंत, लता रेडकर, लव रेडकर, सौ. स्मिता परब, विकी कदम, अमोल सावंत, शाम गवस, लक्ष्मी सावंत, सागर सावंत, अमोल गाड, माजी सचिव संतोष सावंत, समीर सावंत, सुकाजी गावडे, निलेश कदम आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राकेश परब यांनी केले तर आभार सौ. माधवी गाड यांनी मानले.