कुडाळात एसटी वाहक-चालकांचे काम बंद आंदोलन…

180
2
Google search engine
Google search engine

नव्या वेळापत्रकाला विरोध; चर्चेअंती चार तासांनी वाहतूक सुरू…

कुडाळ,ता.०१: एसटी आगारात आज पासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. मात्र नवे वेळापत्रक चुकीचे असून मनमानी पद्धतीने तयार केले असल्याचा आरोप एसटी वाहक आणि चालकांनी केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात आज दुपारी १२ वाजल्यापासून चालक आणि वाहकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे कुडाळ आगारातून १२ वाजल्यानंतर एकही गाडी धावली नाही. त्यामुळे कुडाळला कामानिमित्त आलेले प्रवाशी, विद्यार्थी यांनी हाल झाले. अखेर कर्मचारी, युनियन प्रतिनिधी आणि डेपो मॅनेजर यांच्यात चर्चा होऊन जुन्या वेळापत्रकातील त्रुटी काढून ते लागू करण्यावर एकमत झाल्याने सायंकाळी ४ वाजता गाड्या सुरु झाल्या.

कुडाळ आगारात एसटी बसेस, चालक आणि वाहक कमी आहेत. त्याचा फटका प्रवाशी वर्गाला नेहमी बसतो. याबाबत कुडाळ एसटी आगारातील अधिकारी वर्ग मात्र गप्प असतात असा आरोप करण्यात येतो. आजपासून एसटीचे पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले. पण मुळातच वस्तुस्थितीचा विचार न करता टेबलवर बसून केलेले हे वेळापत्रक असल्याचा आरोप वाहक चालक यांनी केला. बसेस नसल्याने याचा फटका विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना बसला.

त्यातच हिर्लोक ही चांगल्या भारमानाची गाडी नवीन वेळापत्रकानुसार बंद केली. त्याचा सुद्धा फटका प्रवाशांना बसणार असल्याने हिर्लोक सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी डेपो मॅनेजर यांची भेट घेऊन गाडी सुरु करण्याची मागणी केली. सर्व वाहक, चालक, युनियनचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यांनतर हिर्लोक गाडी पूर्ववत सुरु करणार असल्याचे आणि त्रुटी वगळून नवीन वेळापत्रक करणार असल्याचे डेपो मॅनेजर यांनी सांगितले. दरम्यन नवीन वेळापत्रकात त्रुटी दुरुन करूनच वेळापत्रक लागू करावे, अशी मागणी एसटी कामगारसेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक यांनी केली आहे.

यावेळी प्रकाश मोर्ये, दीपक नारकर, अनुप नाईक, हिर्लोक सरपंच, वाहक, चालक आदी उपस्थित होते.

कर्मचारी कमी, गाड्या वेळेवर धावत नाही या गोष्टी कुडाळ आगाराबाबत आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यात अशा वारंवारण होणाऱ्या आंदोलनांची भर पडल्याने गाड्या धावत नाहीत आणि परिणामी त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्याबाबत ठोस तोडगा काढणायची गरज आता निर्माण झाली आहे.