विजेचा खेळखंडोबा, दाखल्यासाठी आलेल्या महिला ताटकळत…

227
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सावंतवाडी तालुक्यातील शेकडो ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला. उत्पन्नाचा दाखल्यासाठी आलेल्या महिलांना अक्षरश अंधारामध्ये उभे राहून दाखल्याचे फॉर्म भरावे लागले. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा केली असून ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आल्याने यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी आज दिवसभर विशेषत: महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
ग्रामीण भागातील महिलांसह शहरातील महिला मोठ्या प्रमाणात दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये आल्या होत्या. मात्र वीज पुरवठा खंडित असल्याने अंधारातच अर्ज, दाखले लिहिण्याचे काम या सर्वांना करावे लागले. वीज पुरवठा खंडित असल्याने पंखे आणि दिवे बंद होते तर काही काळ इन्व्हर्टरची बॅटरी सुरू होती मात्र बॅटरी डाउन झाल्याने सेतू विभागामध्ये अंधारात अभ्यागत महिलांसह कर्मचाऱ्यांनाही चाचपडत काम करावे लागले. पावसाचे दिवस असले तरी उकड्याने हैराण झालेल्या या सर्वांनी वीज महावितरण कंपनी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली
राज्य शासनाकडून एकीकडे योजनेची घोषणा करते मात्र दुसरीकडे या योजनेसाठी लागणारे कागदपत्र गोळा करण्यासाठी त्या त्या कार्यालयामध्ये किमान विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची तसेच सुविधा देण्याची गरज असताना वीज वितरण कंपनीकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची प्रमुख अट आहे. शिवाय आधार कार्ड, निवासी दाखला आणि असेसमेंट उतारा यांच्या झेरॉक्स प्रति जोडाव्या लागणार आहेत. वीज पुरवठा खंडित असल्याने महिलांना बाजारपेठेत येऊन झेरॉक्स काढावी लागली. वीज नसल्यामुळे कॉम्प्युटर आणि इंटरनेट सेवा बंद पडली खरे तर सावंतवाडी शहरातील बहुतांश भागांमध्ये वीज पुरवठा सुरळीत होता मात्र तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विनंती करूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरकार देत असलेल्या योजना आणि दुसरीकडे दाखले बनवण्यासाठी वीज महावितरण कंपनीकडून होत असलेली आडकाठी याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.