बांदा बाजारपेठ उद्या बंद ठेवण्याचे तहसीलदारांचे आदेश…

629
2
Google search engine
Google search engine

अक्रम खान; सोमवारी भरणारा आठवडा बाजार सुद्धा रद्द…

बांदा ता.१७: उद्या सोमवारी भरणारा बांदा शहराचा आठवडा बाजार व बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.त्यामुळे याची नोंद शहरात बाजारासाठी येणाऱ्या दशक्रोशीतील नागरिकांनी घ्यावी,असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
मागील आठवड्यात सोमवारी भरलेल्या आठवडा बाजारात लोकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. खुद्द तहसीलदार म्हात्रे यांनी रस्त्यावर उतरत लोकांना व व्यापाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र शहरात दिवसभर गर्दी होती. जिल्ह्यात व लगतच्या गोवा राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर बांदा आठवडा बाजारात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार म्हात्रे यांनी आठवडा बाजार न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. बांदा बाजारपेठ देखील पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून केवळ मेडिकल व दुध विक्री केंद्रे सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती सरपंच खान यांनी दिली.