“त्या” तीन रुग्णांच्या अतिजोखमीच्या संपर्कातील सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविले…

770
2
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; एकूण एक हजार १४२ व्यक्ती अलगीकरणात…

सिंधुदुर्गनगरी,ता.१७: जिल्ह्यात आढळलेल्या तीन कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या सर्व व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या सर्व व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले असून या सर्वांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत.
जिल्ह्यात एकूण १ हजार १४२ व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्या पैकी ५९५ व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून ५४७ व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी ९४५ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ८ अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत ९३७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून ६३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ११६ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ७ हजार २८८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या ८ कोरोना बाधीत रुग्णांपैकी ४ रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून ४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांनी गोवा शासनाशी केलेल्या चर्चेनंतर जिल्ह्यातील जे विद्यार्थी गोवा राज्यात परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करणे किंवा जिल्ह्याच्या सीमाभागात त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र निर्माण करणे याविषयी गोवा शासन प्रयत्न करत आहे.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने कंटेन्टमेंट झोन व रेड झोन मधून नागरिक आल्यास त्यांना वैद्यकीय सोयीसुविधा पुरवण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तरी नागरिकांनी कोविड-१९ ची बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता. प्रवास करणे टाळावे. घराबाहेर पडु नये, मास्कचा वापर करावा. हात वारंवार धुवावेत तसेच योग्य त्या शारिरीक अंतराचे पालन करावे.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अखेर एकूण १२ हजार ८१२ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.