केसरकरांनी रायगड व प्रतापगडावर बसून सल्ले देवू नये…!

363
2
Google search engine
Google search engine

संजू परबांचा टोला; गोव्याचे मुख्यमंत्री आमचे,शिवसेनेच्या आमदाराची गरज नाही…

सावंतवाडी, ता. २८ : गोव्यात आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकलेल्या गोव्यात काम करणाऱ्या मुलांना आम्ही भाजप म्हणून न्याय देण्यास तयार आहोत. परंतु आमदार दिपक केसरकर यांनी रायगड आणि प्रतापगडावर बसून नाहक सल्ले देण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेच्या आमदारांची आम्हाला गरज नाही,
अशी टीका सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली.दरम्यान श्री.केसरकर यांनी सेट टॉप बॉक्स आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बाबत नेहमीच घोषणा केल्या,त्या घोषणा आतापर्यंत फसव्या निघाल्या आहेत.त्यामुळे आता सिंधुदुर्गातील मुलांना गोव्यात काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,असे सांगून त्यांनी त्या मुलांची फसवणूक करू,नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री. परब म्हणाले, केसरकर यांनी यापूर्वी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यांच्या घोषणा नेहमी फसव्या ठरल्या आहेत. सेटटॉप बॉक्स तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदी गोष्टी लक्षात घेता त्यांनी जनतेला फसविण्याचे काम केले आहे. परंतु आता येथील जनता त्यांच्या फसव्या आश्वासनाला बळी पडणार नाही. गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील मुलांना याठिकाणी नेण्यासंदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तशी चर्चा संबंधित अधिकारी व नेत्यांची सुरू आहे. परंतु केसरकर केवळ श्रेय घेण्यासाठी रायगड व प्रतापगडावर बसून आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो असे सांगून त्या मुलांची दिशाभूल करीत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री आमचे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची आम्हाला गरज नाही.

ते पुढे म्हणाले, या ठिकाणी आणलेल्या रुग्णांना आम्ही जिल्हा रुग्णालयात नेण्याची विनंती केली. याठिकाणी इसोलेशन वॉर्ड नाही, प्रसूत झालेल्या माता आणि नवजात बालके आहेत. त्यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आरोग्य प्रशासनाला ही विनंती केली. त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रशासनाला भेटलो. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागत करून आभार मानतो. येत्या दोन दिवसात सावंतवाडीत ठेवण्यात आलेले रुग्ण नेमके कोठे ठेवावेत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी आपण जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहे. आम्ही कोणाला विरोध करणार नाही. याठिकाणी येणारे रुग्ण किंवा चाकरमानी हे आमचे आहेत. मात्र योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून त्यांना याठिकाणी आयसोलेशन करावे अशी आमची मागणी आहे. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक आदी उपस्थित होते.