उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशानंतर सुध्दा कळणे मायनिंगच्या परवान्याचे नुतनीकरण

998
2
Google search engine
Google search engine

माहीती अधिकारात उघड; वन शक्ती संस्थेकडून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार

सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे,ता.०१: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील क्षेत्रीय कार्यालयाने दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील लोहखनिज खाणीच्या परवान्याचे नूतनीकरण केले आहे. १ मार्च २०२१ पर्यंत कळणे येथील ३२.२५ हेक्टर क्षेत्रात ७.५ मेट्रिक टन लोहखनिजाचे उत्खनन करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबधित कंपनीला परवानगी दिली आहे.वनशक्ती या संस्थेने माहितीच्या अधिकारातून मागितलेल्या माहिती मधून ही बाब समोर आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे बंदी आदेश असतानाही लोहखनिज उत्खनन परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याने वनशक्ती या संस्थेने केंद्रीय पर्यावरण मंत्रालय तसेच राज्य पर्यावरण मंत्रालयाकडे याबाबत तक्रार केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सावंतवाडी व दोडामार्ग कॉरिडॉर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश देताना या भागात प्रदूषणकारी प्रकल्पांना व वृक्षतोडीस बंदी घातली होती.तसेच सध्या सुरू असलेले खाणकाम आदी प्रदूषणकारी प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करण्याचें आदेश दिले होते.तरीही प्रदुषण नियंत्रण मंडळाने कळणे खाणीच्या परवान्याचे नुतनीकरण केले.कळणे खाण परिसरात झालेल्या अवैद्य वृक्षतोडीसह खाणकामाचे गुगल मॅप द्वारा घेण्यात आलेल्या छायाचित्रासह याबाबतची तक्रार वनशक्ती या संस्थेने राज्य व केंद्र शासनाकडे केली आहे.
दरम्यान,कळणे खाणीला २००९ मध्ये पर्यावरण दाखला मिळाला होता.त्यानुसार या खाणीच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आली आहे.हायकोर्टाच्या आदेशापूर्वी ही खाण चालू होती.मात्र हायकोर्टाने स्थगिती दिल्यावर दोडामार्ग तालुक्यात नवीन कोणत्याही प्रदूषण प्रकल्पाला परवानगी देण्यात आली नसल्याचे एमपीसीबीच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.संपूर्ण दोडामार्ग तालुका पश्चिम घाटाच्या ईएसएच्या मसुद्यातून वगळला गेला आहे.मात्र राज्यशासन हायकोर्टाच्या आदेशाचा तपशील तपासत आहे.हे सर्व प्रकरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आले असून,अद्याप मुख्यमंत्री यांनी कोणतेही आदेश दिले नसल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले