सातोसे-दुर्गवाडी “कंटेन्मेंट झोन” जाहीर…

663
2
Google search engine
Google search engine

तीनशे मीटर परिसर सील;संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू,दोघांचे स्वॅब घेतले….

बांदा,ता.०३: सातोसे-दुर्गवाडी येथे संस्थात्मक क्वारंटाईन असलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दुर्गवाडी परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाला आहे. त्यामुळे बांदा पोलीसांनी आज सायंकाळी ३०० मीटरपर्यंतचे अंतर सील केले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांचे स्वॅब आतापर्यंत आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
सातोसे येथील मुंबईहून आलेल्या तरुणाला प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. सदर तरुणाला ताप व खोकला येत असल्याने तीन दिवसांपूर्वी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर तरुणाचा स्वॅब अहवाल काल सायंकाळी पॉझिटीव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली असून सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी ३०० मीटरपर्यंतचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तसे पत्र बांदा पोलीसांना प्राप्त झाल्यानंतर ३०० मीटरपर्यंतचे क्षेत्र सील करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने या तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सदर तरुणाचे वडील व भाऊ यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. अजूनही रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.