बीच शॅक्स धोरणामुळे रोजगाराचे नवे दालन खुले…

236
2
Google search engine
Google search engine

हरी खोबरेकर यांचा विश्वास ; मुख्यमंत्री ठाकरेंसह मंत्रिमंडळाचे मानले आभार…

मालवण, ता २७ : सागरी पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्लीसह कोकण किनारपट्टीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे. ही बाब आमच्यासाठी आनंदाची व अभिमानाची असून पर्यटन वाढीबरोबर रोजगाराचे नवे दालन खुली करणारी आहे. असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला.
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक्स धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत राज्यातील ८ समुद्रकिनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅक्ससाठी मंजुरी दिली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत. कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक्स धोरणास मान्यता मिळाल्यामुळे भविष्यात देशी-विदेशी पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिकांसाठी रोजगाराचे नवे दालन उभे राहणार आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने येथील पर्यटन विकासासाठी ज्या मागण्या आम्ही आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पोचविल्या त्यात बीच शॅक्स ही मागणीही प्रामुख्याने होती. या मागणीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळचे आम्ही आभारी आहोत असे श्री. खोबरेकर यांनी सांगितले. मालवण तालुक्यातील किनारपट्टी भागातील गावांमध्ये बीचवर शॅक्स धोरणास मंजुरी मिळावी यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार आपण पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे खोबरेकर यांनी सांगितले.
कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच झुकते माप दिले आहे. कोकणावर असलेले विशेष प्रेम पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या कामातून दाखवून दिले आहे. मच्छीमारांसह शेतकरी वर्गाला फायदेशीर ठरणारी चांदा ते बांदा योजना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून यापूर्वी राबवण्यात आली. यापुढे नव्या योजनेतून शेतकरी, मच्छीमार यांच्यासह पर्यटन व्यावसायिक व अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.