हळदीचा ब्रँड तयार झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ…

203
2
Google search engine
Google search engine

माजी राज्यमंत्री चव्हाण ; शेती बरोबर मत्स्यपालनास प्रोत्साहन देणार…

मालवण, ता. २९ : सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत जिल्ह्यात कमी काळात भरघोस उत्पन्न देणाऱ्या हळद लागवडीचा प्रयोग केला आहे. जिल्ह्यात हळदीचा ब्रँड तयार झाल्यास येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल. शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रयत्न असतील असे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कांदळगाव येथे स्पष्ट केले.
येथील दौऱ्यावर आलेल्या श्री. चव्हाण यांनी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेला बळ देण्याच्या पार्श्वभूमीवर हडी, तोंडवळी, आचरा येथे बचतगट तसेच खासगी तत्त्वावर राबविलेल्या केच फार्मिंगची पाहणी केली. लॉकडाऊनच्या काळात या व्यावसायिकांना ज्या अडचणी आल्या त्याची माहिती घेतली. त्यानंतर कांदळगाव येथील नीलक्रांती मल्टीपर्पज सेंटर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, विलास हडकर, डॉ. प्रसाद देवधर, डॉ. नितीन सावंत, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, रविकिरण तोरसकर, भाऊ सामंत, बाबा परब, गणेश कुशे, पूजा सरकारे, आप्पा लुडबे, अविनाश पराडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात कोकणातील चाकरमान्यांसाठी काही करता येईल का यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात जिल्ह्यात हळद लागवडीचा उपक्रम राबविला आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळेल. खाडी क्षेत्राबरोबरच ज्या ठिकाणी नैसर्गिक तळ्या आहेत. अशा ठिकाणांचा शोध घेण्यात आला असून दहा ते पंधरा जागा जिल्ह्यात निश्चित करण्यात आल्या आहेत. याठिकाणी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्यपालनास प्रोत्साहन दिले जाणार आहे. मुंबईतून जे चाकरमानी येथे आले त्यातील तरुण या व्यवसायात उतरावेत यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रयत्न असतील. जेणेकरून तरुणांचे स्थलांतर थांबेल. जिल्ह्यातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत असून याचे यश येत्या तीन महिन्यात आपल्याला दिसून येईल असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.