आम्ही जमिन देण्यास तयार ,पण आमचे नुकसान नको…!

453
2
Google search engine
Google search engine

युवराज लखमराजे; प्राथमिक चर्चेत  केसरकरांनी मोबदला देण्याचा शब्द दिल्याचे म्हणणे…

सावंतवाडी ता.३०:  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा मागताना तत्कालीन पालकमंत्री आणि विदयमान आमदार दिपक केसरकर यांनी त्या जागेपोटी आपल्याला काही मोबदला देणार असल्याचा शब्द दिला होता.त्यामुळे आम्ही जमिन देण्यास तयार आहोत,मात्र त्यात आमचे मोठे नुकसान नको,अशी भूमिका सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी मांडली.दरम्यान पर्यायी जागा जरी मोफत मिळाली,तरी त्या ठीकाणी रस्ते,कुुंपण आणि नियोजित इमारती उभारण्यास खर्च होणार आहे.तसेच वेळही जाणार आहे.त्यामुळे या जागेचा सकारात्मक विचार होण्यास हरकत नाही,असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राजघराण्याची भेट घेतली.यावेळी राजे खेमसावंत भोसले,शुभदादेवी भोसले,लखमसावंत आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी त्या ठीकाणी आवश्यक असलेली जागा विनामोबदला द्या,अशी मागणी केली.याबाबतची पत्रकार परिषदेत माहीती दिली.त्यानंतर श्री.लखमराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मागच्या चर्चे दरम्यान आमदार केसरकर यांनी आम्हाला स्वतःहून पुढाकार घेवून या जागेचा मोबदला देण्याचे मान्य केले होते.त्यानुसार आपण होकार दर्शविला होता.मात्र आज या ठीकाणी आलेल्या शिष्टमंडळाकडुन कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही.तसेच ही जागा विनामुल्य देण्यात यावी,अशी मागणी झाली असली,तरी आम्ही राजघराणे म्हणून जागा देण्यास कधीही विरोध दर्शविला नाही.परंतू त्यात आमचे नुकसान होवू नये,याची दक्षता शासनाने घेणे गरजेचे आहे.आणि एवढेच आमचे म्हणणे आहे.
ते पुढे म्हणाले,जरी पर्यायी जागेचा विचार झाला,तर त्या ठीकाणी जाण्यासाठी रस्ते,कुंपण इमारती आदी गोष्टी उभाराव्या लागणार आहेत.त्यासाठी बराचसा निधी खर्च करावाच लागणार आहे.मात्र हीच जागा निवडली गेल्यास त्याचा या सर्व गोष्टींची तितकीशी गरज नाही.या ठीकाणी काही इमारती सुध्दा उभ्या आहेत.ही जागा शहराच्या मधोमध असल्यामुळे सोईची आहे.लोकांची सुध्दा तशीच मागणी आहे.त्यामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला सहकार्य करावे,असे लखम राजे म्हणाले.