शेर्लेतील “त्या” वराहपालना विरोधात १५ ऑगस्टला पुन्हा उपोषण…

181
2
Google search engine
Google search engine

बांदा.ता.११:
शेर्ले-शेटकरवाडी येथील वासना पेडणेकर व कुटुंबीयांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून बेकायदेशीर वराह पालन केंद्र भर वस्तीत सुरू केले आहे. यामुळे वाडीत दुर्गंधी पसरली असून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महिनाभरापूर्वी उपोषण छेडण्यात आले होते. त्यावेळी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते, मात्र अद्याप कारवाई न केल्याने येत्या स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी पुन्हा शेर्ले ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा साईप्रसाद पेडणेकर व महादेव धुरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
वराह पालन विरोधात कारवाई करण्यासाठी पेडणेकर, धुरी यांच्यासह ५ जणांनी १४ जुलै रोजी शेर्ले ग्रामपंचायत आवारात साखळी उपोषण केले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक, सभापती, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी भेट देऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिनाभराचा कालावधी होऊनही अद्यापपर्यंत कारवाई करण्यात न आल्याने पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सावंतवाडी तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा पोलीस निरीक्षक, शेर्ले सरपंच, सावंतवाडी गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्याधिकारी यांना दिले आहे.
ग्रामपंचायतीच्या आवारात सामाजिक अंतर राखून लोकशाहीच्या मार्गाने उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.