टॉयलेट न दिल्याने राऊतांचा रिफायनरीला विरोध…

148
2
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार : दलाली सिद्ध करा अन्यथा भर चौकात माफी मागा

कणकवली, ता.३ : केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी खासदार विनायक राऊत यांना २ टॉयलेट सीएसआर फंडातून दिले नाहीत, म्हणून ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करीत आहेत असा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी आज केला. तसेच रिफायनरी प्रकल्पात दलाली असल्याचे सिद्ध करा अन्यथा भर चौकात माफी मागा असेही ते म्हणाले.
येथील भाजप कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रवींद्र शेट्ये, शिशिर परुळेकर, चंद्रहास सावंत आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.जठार म्हणाले, राज्य सरकारने ३५ हजार कोटींचे ११ प्रकल्प राज्यात आणण्याची घोषणा केलीय. पण त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गात ३ लाख कोटींचा आणि एक लाख थेट रोजगार देणारा प्रकल्प नको आहे ही दुदैवाची बाब आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या दालनात गेल्यानंतर खासदार विनायक राऊत रिफायनरी प्रकल्पाला का विरोध करत आहेत ही बाब लक्षात आली. सीएसआर फंडातून राऊत यांनी दोन टॉयलेट मागितले होते. कामाच्या गडबडीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री ते विसरून गेले. मात्र टॉयलेट न मिळाल्याने राऊत यांनी रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्याचा विडा उचलला आहे.
श्री.जठार म्हणाले, दोन टॉयलेट साठी खासदार विनायक राऊत हे १ लाख बेरोजगारांचा रोजगार हिरावून घेण्याचे पातक करत आहेत. दरम्यान रिफायनरी प्रकल्पात आमची दलाली असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. मात्र दलाली असल्याचे त्यांनी सिद्ध करावे. किंबहूना नाणार परिसरात आमची एक फुट जागा असल्याचे त्यांनी दाखवून द्यावे. त्यांनी आपले आरोप सिद्ध केले तर आम्ही फासावर देखील जायला तयार आहोत. पण आरोप खोटे ठरले तर राऊत यांनी जाहीर चौकात माफी मागायला हवी.