प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या कोकण संयोजकपदी रविकिरण तोरसकर यांची निवड…

431
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ०७ : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कोकण विभागाच्या संयोजकपदी रविकिरण तोरसकर यांची निवड करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानचे प्रदेश संयोजक माधव भांडारी व प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी ही निवड जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली आहे. २० हजार कोटी रुपये रकमेची ही योजना भारतातील खारे, नीमखारे व गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, त्यामुळे निर्माण होणारे रोजगार व सशक्त अर्थकारण यासाठी दिशादर्शक आहे. या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचावी यासाठी विशेष नियोजन केले आहे. त्यासाठी पूर्णपणे समर्पित टीम प्रत्येक जिल्ह्यात उभी रहात आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यातील संबंधित विषयात काम करणारे पदाधिकारी, राज्यातील मत्स्यव्यवसाय खाते, केंद्र सरकार आणि लाभार्थी यांच्यामध्ये समन्वय रहावा यासाठी भारतीय जनता पार्टीने रविकिरण तोरसकर यांची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कोकण संयोजकपदी निवड केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानचे प्रदेश संयोजक माधव भांडारी व प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी ही निवड जाहीर केली आहे.
याबद्दल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी बंदर मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, बाळू देसाई उपस्थित होते.
पंतप्रधानांचे स्वप्न असलेल्या महत्वाकांक्षी निलक्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महत्वाचा टप्पा ठरेल असे यावेळी उपस्थितांनी स्पष्ट केले. एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजनबद्ध काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.