महिलांनी जीवनमान उंचाविण्यासाठी एकमेकांशी संवाद साधावा…

136
2
Google search engine
Google search engine

एस.व्ही.हांडे; कायदेविषयक जनजागृती व महिलांचे सशक्तीकरण विषयावर मार्गदर्शन…

सावंतवाडी ता.०८: यांत्रिकरण इंटरनेट युगात संवाद हरवला आहे.यामुळे घरोघरी संवाद हरवत असताना मनातील संवादाची गरज निर्माण झाली आहे.महिलांनी एकमेकांशी संवाद साधून ताणतणावाच्या गोष्टीवर फुंकर घातल्यास नक्कीच महिलांचे जीवनमान उंचावले,असा विश्वास जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.व्ही.हांडे यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राष्ट्रीय महिला आयोग तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सावंतवाडी वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात कायदेविषयक जनजागृती महिलांचे सशक्तीकरण या विषयावर जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे बोलत होते.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव डी बी म्हालटकर ,सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष श्रीमती आर आर बेडगकर,सह दिवाणी न्यायाधीश एस एच पन्हाळे, वकील संघटना उपाध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर ,बालकल्याण समिती सदस्य पी.डी.देसाई, अँड शामराव सावंत, अँड वेदिका राऊळ, विशेष सहाय्यक वकील स्वप्नील कोलगावकर, अँड ऐश्वर्या मुंज आदी उपस्थित होते.

महिला सशक्तिकरण म्हणजे महिला शक्ती आहे. फक्त ती सबल करणे गरजेचे आहे. नारीशक्तीच्या नारायणी रूपाचे दर्शन नवरात्र उत्सवात होते. महिलांच्या शक्ती विविध रूपाने प्रकट झाल्यास सबलीकरण होईल. सावित्रीबाई फुले यांचे कार्य सहनशीलता दर्शवते. महिलांमध्ये अनेक क्षमता दडलेल्या आहेत त्या प्रकट झाल्या पाहिजे असे जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे म्हणाले.
महिलांचा विकास करताना अंगणवाडी ताई यांचे संपूर्ण रूप नारायणी स्वरूप मानायला हवे या सेविका वेगवेगळ्या कारणांनी घरोघरी पोहचत आहेत. त्या सर्वांना योग्य मार्गदर्शन करू शकतात असे ते म्हणाले. न्यायालयांमध्ये विवाहविषयक अनेक खटले पडून राहिले आहेत अंगणवाडी ताईंनी महिला मधील संवाद साधून प्रबोधन साधल्यास शांततापूर्ण मार्गाने समेट होऊन महिलांचा तणाव दूर होईल असे न्यायाधीश हांडे म्हणाले.

आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून अर्थकारणाचा गाडा हाकत आहेत मात्र यांत्रिकरणात महिलांमधील एकमेकांचा संवाद हरवला आहे घरोघरी हरवलेला संवाद साधण्यासाठी महिलांनी एकमेकांच्या दुःखावर फुंकर घातल्यास यश मिळू शकते तसेच अनैतीक प्रकार, महिलांवरील अन्याय झाला असेल तर नजीकच्या पोलिस ठाण्यात किंवा विधी सेवा समितीकडे योग्य ती तक्रार केल्यास त्यातून मार्ग निघू शकतो असे देखील ते म्हणाले.

यावेळी अँड ऐश्वर्या मुंज यांनी महिलांचे हक्क जनन आरोग्य व महिला कैदी याविषयी मार्गदर्शन करताना महिलांना मिळालेल्या हक्कांचे विश्लेषण केले सावंतवाडी वकील संघटनेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर यांनी प्रास्ताविक करताना कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला हवे तसेच महिलांच्या विषयी वेगवेगळ्या निर्माण झालेल्या कायद्यांची माहिती दिली.
यावेळी अँड शामराव सावंत, अँड पी डी देसाई, न्यायाधीश आर आर बेडगकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सावित्रीबाई फुले यांना पुष्पांजली वाहत दीपप्रज्वलनाने न्यायाधीश हांडे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष सरकारी वकील स्वप्नील कोलगावकर यांनी केले.यावेळी न्यायालय सहाय्यक अधीक्षक आर आर तारी, एन एन गिरप, विजय पवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलिस उपनिरीक्षक स्वाती यादव, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव आदी उपस्थित होते.