कणकवलीत बॉक्सवेलऐवजी गर्डर-पिलरचा उड्डाणपूल…

108
2
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार ; खासदार राऊतांकडे प्रगल्भता नसल्याने बेरोजगार उपाशी…

कणकवली, ता.८ ः कणकवलीत कोसळलेल्या बॉक्सवेलच्या ठिकाणी पिलर-गर्डरचा उड्डाणपूल होणार आहे. त्यासाठी आमचा केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी आज दिली. तर कोकणवासीयांमध्ये जेवढी प्रगल्भता आहे, तेवढी खासदार विनायक राऊत यांच्याकडे नाही. इथले बेरोजगारांवर उपाशी मरण्याची वेळ आली तरीही ते नाणार रिफायनरीला विरोध करत असल्याचेही ते म्हणाले.
प्रमोद जठार यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, ओबीसीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष नरेंद्र गावकर, क्रीडा भारती अध्यक्ष रवी करमळकर, नगरसेवक शिशिर परुळेकर उपस्थित होते.
श्री.जठार पुढे म्हणाले, सिंधुदुर्गातील चौपदरीकरण प्रकल्पासाठी ४० कोटी नव्हे तर ४०० कोटी रूपये आणण्याची आमची तयारी आहे. परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणाचा प्रश्न रखडलेला होता. परशुराम घाटातील जमीन मालक व परशुराम देवस्थानचे ट्रस्टी यांच्यात समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. तेथे आता चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. शास्त्री पुलाचे काम रखडले तेही मार्गी लावण्यात यश आले आहे. संगमेश्वर मध्ये ४५ मीटर भूसंपादन करण्यात आले होते. मात्र शास्त्री पुलाचे स्ट्रक्चर बदलल्याने येथे ६० मीटर भूसंपादनाची आवश्यकता भासत होती. त्याबाबतही मार्ग काढण्यात आला असून ४५ मीटरमध्ये तेथे काम करण्यात येत आहे.
श्री.जठार म्हणाले, कोकणातील जनतेने चौपदरीकरणासाठी संपूर्ण सहकार्य केले. त्याचधर्तीवर नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीही पाठिंबा दर्शवला. मात्र कोकणवासीयांएवढी प्रगल्भता खासदार विनायक राऊत यांच्याकडे नाही. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, छोटे उद्योग बंद पडले. यात हजारो तरूण बेरोजगार झाले. त्यांच्यावर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मात्र खासदारांना त्याची पर्वा नाही. त्यांची नाणार रिफायनरीला विरोध कायम ठेवल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गातील एक लाख तरूणांना रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे.
भारत बंद हा विषय कोकणात व मुंबईत फेल गेल्याची टीका श्री.जठार केली. केंद्र सरकारने कृषी विषयक तीन कायदे आणले. त्यात थेट माल ग्राहकाकडे गेला तर दलालांचा फायदा कमी होत असल्यामुळे दलालांनी भारत बंद चा पर्याय निवडला. महा विकास आघाडीचे प्रणेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रात एपीएमसी मार्केट बंद व दलालांची साखळी तोडण्याबाबत समर्थन करण्यात आले. दलाल माजल्यामुळे भारत बंद चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी जवान व किसान असल्यामुळेच कोकण व मुंबईत भारत बंद चा फज्जा उडाल्याचेही ते म्हणाले.