सावंतवाडी तालुक्‍यात ११ ग्रामपंचायतीसाठी ३८३ अर्ज दाखल…

235
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.३०: तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाली. शेवटच्या दिवशी प्राप्त अर्ज करून अकरा ग्रामपंचायतीसाठी एकूण 383 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत आहेत. त्यासाठी २३ ते ३० डिसेंबर हा कालावधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आला होता. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवातीला कोणीच रस दाखवला नाही, मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांकडून येथील तहसील कार्यालयामध्ये मोठी गर्दी करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता निवडणूक निर्णय अधिकारी श्री म्हात्रे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमून वेगळी व्यवस्था केली होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र शेवटचा दिवस असल्याने झालेली गर्दी लक्षात घेता तीन वाजताची मुदत वाढवून साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.
अकरा ग्रामपंचायतीमध्ये कोलगाव ग्रामपंचायतीच्या १५ जागेसाठी साठी ६२, मळगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागेसाठी साठी ४३, आंबोली ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी ३७, चौकूळ ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी ३९, तळवडे ग्रामपंचायतीच्या १३ जागेसाठी ४८, मळेवाड ग्रामपंचायतीच्या अकरा जागेसाठी ३५, दांडेली ग्रामपंचायतीच्या ७ जागेसाठी २०, फारच ग्रामपंचायतीच्या ७ जागेसाठी १५, इन्सुली ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी ४०, डिंगणे ग्रामपंचायतीच्या ९ जागेसाठी २० तर आरोंदा ग्रामपंचायतीच्या ११ जागेसाठी २४ अशा एकूण ११९ जागेकरिता ३८३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी मध्ये फूट पडल्याचे दिसून आले. इन्सुली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेने बरोबरच काँग्रेस कडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र चार जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी येथे महा विकास आघाडी मध्ये समझोता होतो किंवा नाही, हे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आपण काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याशी चर्चा केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज घेण्याच्या मागे दिवशी जागावाटपाचा मध्ये याठिकाणी दोघांचे समाधान झाल्यास याठिकाणी वेगळे चित्र दिसणार आहे. तर इतर काही ठिकाणी मात्र भाजपा महा विकास आघाडी पुरस्कृत पॅनल आणि गाव विकास पॅनल अशा लढती दिसणार आहेत.