“त्या” व्यक्तीवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा शाळा बंद आंदोलन…

378
2
Google search engine
Google search engine

शिक्षक संघटनांचा इशारा; जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन सादर…

ओरोस,ता.२१:
कुडाळ तालुक्यातील जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स या प्रशालेतील शिक्षक अनिल काटकर यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक न केल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सबंधित आरोपीला अटक झाली नाहीतर जिल्हाभर शाळा बंद आंदोलन किंवा मोर्चा अशी भूमिका माध्यमिक शिक्षकांना घ्यावी लागेल, असा इशारा गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन दिल्यानंतर सिंधूदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ व सिंधूदुर्ग जिल्हा शिक्षक भारती या संघटनेने दिले आहे.
जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स या प्रशालेचे ज्युनिअर कॉलेजचे वर्ग सकाळी ८ वाजता भरतात. त्यापूर्वी ७.३० वाजता सँनिटायझर व ऑक्सिमिटर तपासणी केली जाते. १९ जानेवारी रोजी सकाळी ही प्रक्रिया सुरु असताना एक विद्यार्थी तेथे आला. त्याने मास्क लावले नव्हते. त्याला मास्क लावण्यास सांगून वर्गात जाण्यास सांगितले. मात्र, तो वर्गात न जाता अन्य ठिकाणी जावून असभ्य चाळे करु लागला. त्यामुळे अनिल सहदेव काटकर या शिक्षकांनी बोलावून घेत समज दिली. तरीही तो ऐकत नसल्याने शिक्षक काटकर यानी त्याला पालकाना बोलावून घेण्यास सांगितले. दरम्यान, हा विषय मुख्याध्यापक एस एस सावंत यांना कळला. त्यानीही पालकाना फोन करून मी ९ वाजता येणार आहे. त्यावेळी तुम्ही या, असे सांगितले. मात्र, तोपर्यंत पालक रोहित चंद्रकांत मडव हे शाळेत पोहोचले होते. त्यानीही त्या विद्यार्थ्या प्रमाणे शिक्षक काटकर यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करीत तीन वेला त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. यावेळी अन्य दोन शिक्षकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कॉलेजमध्ये उपस्थित असलेली सुमारे १०० मुले हा प्रकार पाहत होती.
त्यानंतर संस्थेची सभा होवून याबाबत तक्रार देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १९ रोजी सायंकाळी कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, त्यानंतर दोन दिवस उलटले तरी सबंधित पालकाला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे यांची मुख्याध्यापक एस एस सावंत यानी भेट घेतली. यावेळी प्रशालेचे शिक्षक तसेच सिंधूदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ पदाधिकारी अजय शिंदे, टी के पाटील, प्रकाश कानूरकर, दशरथ काठे, विजय मयेकर, प्रशांत चव्हाण, महादेव बाणेकर, सुजीत गंगावने, एस पी गांवकर, ए वाय कासले, डी एल मेस्त्री, आर के कदम, रंजन मेस्त्री, आर एन ठाकुर, सुदिन पेडणेकर, अच्युत वणवे श्री हंकारे, श्री ठाकुर, श्रीमती जांभवडेकर, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर आदी उपस्थित होते.