दुचाकी चोरट्यास कोल्हापुरात पकडले…

370
2
Google search engine
Google search engine

मालवण पोलिसांची कारवाई ; सोमवारपर्यंत पोलिस कोठडी…

मालवण, ता. ५ : येथील बंदर जेटी परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीसह संशयित आरोपी रफिक शेख (वय-३५) याला मालवण पोलिसांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. संशयित आरोपी शेख याला येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बंदरजेटी परिसरात सुशांत शेलटकर यांनी बुधवारी आपली दुचाकी (एमएच ०७ एएफ-९६०३) उभी करून ठेवली होती. ते समुद्रस्नान करण्यास गेले. त्या दुचाकीची चावी काढण्यास ते विसरले तसेच दुचाकीच्या डिकीमध्ये मोबाईल राहिला होता. शेलटकर हे समुद्र स्नानासाठी गेले असता वर्दळीच्या ठिकाणाहून अज्ञाताने दुचाकी चोरल्याची घटना उघडकीस आली.
याप्रकरणी शेलटकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीमध्ये राहिलेल्या मोबाईलद्वारे लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना कोल्हापूर येथील लोकेशन मिळाले. त्यानुसार पोलिस कर्मचारी पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर यांचे पथक कोल्हापूर येथे रवाना झाले. त्यांनी शाहू विक्रमनगर कोल्हापूर येथून संशयित आरोपी रफिक शेख याला दुचाकीसह ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला येथे आणण्यात आले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस करत आहेत.