लहान बंदरांच्या विकासासाठी ४ कोटी मंजूर…

188
2
Google search engine
Google search engine

हरी खोबरेकर ; मच्छीमारांच्या मागण्यांची वचनपूर्ती, खासदार, पालकमंत्री, आमदारांचे मानले आभार…

मालवण, ता. १९ : जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना लहान मासेमारी बंदरांचा विकासांतर्गत सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत आमदार वैभव नाईक यांनी मच्छीमारांना दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. या योजनेंतर्गत मालवणसाठी २ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
बंदरांच्या विकासासाठी विविध कामांची मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी तरतूद करून घेतली. त्यानुसार जिल्ह्याला ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात तालुक्यासाठी २ कोटी ५० लाख, देवगड तालुक्यासाठी १ कोटी ३० लाख, वेंगुर्ले तालुक्यासाठी ६८ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
मालवण-कुडाळ तालुक्यातील चेंदवण, सर्जेकोट पिरावाडी, आचरा पिरावाडी, वायरी भूतनाथ, देवबाग, मोबारवाडी, कवठी गोडसे साना येथील कामांचा समावेश आहे. यात पर्यटन जेटी, मत्स्यजेटी, मासळी सुकविणे ओटा, रॅम्प, जोडरस्ता, मत्स्यखरेदी लिलावगृह अशा कामांचा समावेश आहे. या कामांचे आराखडे, निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून ही कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. ही कामे मंजूर केल्याबद्दल आमदार नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांचे श्री. खोबरेकर यांनी आभार मानले आहेत.
यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर,
किरण वाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.