राणेंच्या मध्यस्थीनंतर गोव्याकडे जाणार्‍या वाळू वाहतूकीचा मार्ग मोकळा…

293
2
Google search engine
Google search engine

व्यावसायिंकातून समाधान; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा,२५ दिवसांनी पुन्हा वाहतूक सुरू…

कणकवली,ता.०६: सिंधुदूर्गात गोव्यात वाळू घेवून जाणार्‍या व्यावसायिकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी खुद्द माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढला आहे. त्यामुळे गेले पंचविस दिवस रखडलेली वाहतूक अखेर सुरू होणार आहे.त्यामुळे व्यावसायिकांतून आनंद व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिक मोठ्या प्रमाणात गोव्यात वाळूपुरावठा करतात. सिंधुदुर्गातील दोनशेहून अधिक वाळू व्यावसायिक डंपरमालक चालक दररोज गोव्यात वाळू व्यवसाय करतात. विशेषतः कुडाळ, मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिक गोव्याला वाळूपुरवठा करतात. मात्र मागील २५ दिवसांपासून झालेल्या वादात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्या डंपर ना गोव्यात नो एन्ट्री होती. त्यामुळे वाळू व्यावसायिक डंपर-चालक हवालदिल झाले होते. याबाबत वाळू व्यावसायिकांनी माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, आमदार नितेश राणे , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे तोडगा काढण्याची मागणी केली होती. जि.प.गटनेते रणजित देसाई यांनीही हा प्रश्न राणे कुटुंबियांकडे मांडला होता. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्व वाळू व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्याकडे आपले गार्‍हाणे मांडले. खासदार नारायण राणे यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. राणे आणि सावंत यांच्यात झालेल्या यशस्वी चर्चेनंतर सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांच्या गाड्या गोव्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या वाळू व्यावसायिकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल वाळू व्यावसायिकांनी खासदार नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, रणजित देसाई यांचे आभार मानले आहेत.