देवबाग, आचरा जामडूलला होणार टँकरने पाणीपुरवठा…

78
2
Google search engine
Google search engine

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी घेतली दखल ; देवबाग गावाला दिला पूर्णवेळ ग्रामसेवक…

मालवण, ता. १९ : देवबाग व आचरा जामडूल येथील गोड्या पाण्याचे प्रवाह उधाणाचे खारे पाणी घुसल्याने दूषित झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी याची तत्काळ दखल घेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांना पाण्याचे प्रवाह पिण्यायोग्य होत नाहीत तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान देवबाग गावास पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कालपासून देवबाग गावासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून दिला आहे.
तौक्ते चक्रीवादळ नुकसानीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षा अध्यक्ष संजना सावंत यांनी तालुक्यातील देवबाग, आचरा जामडूल परिसराची दोन दिवसांपूर्वी पाहणी केली होती. या भेटीवेळी देवबाग व आचरा जामडूल परिसरातील गोड्या पाण्याचे प्रवाह उधाणाचे खारे पाणी घुसून दूषित झाल्यामुळे या परिसरातील लोकांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल झाले होते. याबाबतची कैफियत ग्रामस्थांनी सौ. सावंत यांच्यासमोर मांडली. याची दखल घेत सौ. सावंत यांनी तातडीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यामुळे या भागातील खाऱ्या पाण्याचे प्रवाह पूर्णपणे पिण्याचे योग्य होईपर्यंत देवबाग व आचरा जामडूल परिसरामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. देवबाग ग्रामपंचायतीस कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने या भागातील पंचनामे करताना अडचण निर्माण झालली होती. याची दखल घेत काल ता. १८ पासून या भागासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने उपलब्ध करून दिला आहे.
आचरा जामडुल परिसर खाडी किनारा क्षेत्रांमध्ये भरतीच्या वेळी पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढून आचरा जामडूल परिसरातील घरांमध्ये पाणी घुसून आर्थिक नुकसान होत असल्याने या ठिकाणी खाडी किनारा क्षेत्रांमध्ये धूप प्रतिबंधक बंधारा होण्याबाबत जिल्हाधिकारी, खारभूमी विकास योजनेचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष वेधले आहे. यापुढेही नुकसानग्रस्त भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सावंत यांनी स्पष्ट केले.